Rahul Gandhi Attacks Modi Government : विचारधारेसाठी माझी लढाई सुरु राहणार आणि आम्ही ती जिंकू असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. भिवंडी न्यायालयात हजर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. आरएसएस विरोधातील वक्तव्यामुळे त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी राहुल गांधी आज न्यायालयात हजर होण्यासाठी भिवंडीत आले होते. न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात आरोप निश्चित केले असून १० ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी हे सर्वात श्रीमंत लोकांचं सरकार आहे अशी टीका केली. शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी या तिन्ही मुद्द्यांवर नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरलं आहे असंही ते म्हणाले. विचारधारेसाठी माझी लढाई सुरु राहणार आणि ही लढाई आम्ही नक्की जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कारण महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान केल्याप्रकरणी मानहानीच्या खटल्यात त्यांच्यावर भिवंडी न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. आयपीसी कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मी निर्दोष असून निश्चित केलेले आरोप अमान्य असल्याचं राहुल यांनी कोर्टात सांगितलं. याप्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सुनावणी दरम्यान राहुल यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अशोक गहलोत हे देखील उपस्थित होते.
मार्च २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. याप्रकरणी भिवंडीतील संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याप्रकरणी ते आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहिले. राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाला छावणीचं रुप आलं होतं.
मार्च २०१५ मध्ये या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे ते न्यायालयात हजर राहू शकणार नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. अखेर नोव्हेंबर २०१६ मध्ये राहुल गांधी न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.