वीस वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या सीजीएम कोर्टाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवलं आहे. मात्र या प्रकरणात त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना जोधपूर सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवलं.

१९९८ च्या या प्रकरणात सलमान खानसह सहा जणांवर खटला चालला, पण २० वर्षांनंतरही एक असा आरोपी आहे ज्याला पोलीस पकडू शकले नाहीत. या प्रकरणात एकूण सात आरोपी होते. यामध्ये सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, नीलम आणि तब्‍बू यांच्याशिवाय ट्रॅव्हल एजंट दुष्‍यंत सिंह आणि दिनेश गावरे यांचंही नाव होतं. हे ट्रॅव्हल एजंट त्यावेळी सलमानचे असिस्टंट होते. पण काळवीट शिकारीचं हे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर दिनेश गावरे फरार झाले. आजपर्यंत त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आलं, गावरेच्या गैरहजेरीत केवळ सहा जणांवरच हा खटला चालला.

प्रकरण काय?
हम साथ साथ हैं या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.