गांधी कुटुंबीयांना सुरक्षा तपासणीबाबत देण्यात आलेली सवलत रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या प्रियांका गांधी-वढेरा यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी फटकारले आहे. एखाद्याला देण्यात आलेली सुरक्षा कोणाच्या लहरीवर आणि तालावर अवलंबून नसते, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
सुरक्षेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, या प्रश्नावर राजकीय लाभ उठविण्याचा कोण का प्रयत्न करीत आहे, तेच अनाकलनीय आहे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे. सुरक्षा एखाद्या व्यक्तीच्या लहरीवर अवलंबून नसते, असेही त्यांनी प्रियंका यांचा नामोल्लेख न करता स्पष्ट केले आहे.
प्रियंका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना विमानतळीवरील नियमित सुरक्षा तपासणीमधून देण्यात आलेली सवलत रद्द करण्याचा सरकार विचार करीत असल्याचे वृत्त आल्यानंतर प्रियंका यांनी विशेष संरक्षण गटाच्या प्रमुखांना पत्र लिहून गांधी कुटुंबीयांना देण्यात आलेली सवलत रद्द करण्याची मागणी केली होती.
सुरक्षा तपासणीमधून कोणाला सवलत द्यावयाची याची यादी करण्यात आली असून, त्यामध्ये रॉबर्ट वढेरा यांच्या नावाचा समावेश एसपीजीच्या माजी प्रमुखांनी आणि दिल्ली पोलिसांनी घेतला होता. आम्ही अशी कोणतीही मागणी केली नव्हती, असे प्रियांका यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत उचित निर्णय संबंधित सुरक्षा यंत्रणाच घेईल, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.