भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावणारे महान क्रांतीकारक शहीद राजगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, असा दावा संघाने केला आहे. संघ प्रचारक आणि अभाविपच्या हरयाणा शाखेचे संघटन मंत्री म्हणून काम पाहिलेल्या नरेंद्र सेहगल यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. राजगुरू हे संघाच्या मोहिते वाड्याचे स्वयंसेवक होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. राजगुरू यांचे संघ संस्थापक हेडगेवार यांच्याशी निकटचे संबंध होते. त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस हेही संघाच्या कार्यामुळे प्रभावित झाले होते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.

सेहगल यांच्या ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक १४७ वर लिहिले आहे की, लाला लजपत राय यांच्या हौताम्याचा बदला घेण्यासाठी भगत सिंग आणि राजगुरू यांनी इंग्रज पोलीस अधिकारी सँडर्सवर लाहोर येथे गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर दोघांनी लाहोर सोडले. राजगुरू यांनी नागपूर येथे येऊन डॉ. हेडगेवार यांची भेट घेतली. राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते. हेडगेवार यांनी आपले सहकारी भैयाजी दाणी यांच्या फार्म हाऊसवर राजगुरू यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती.

स्वातंत्र्य लढ्यात संघाच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जाते. त्याला या पुस्तकातून उत्तर देण्यात आल्याचे सांगण्यात येते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या पुस्तकात याविषयी आपली भूमिका मांडली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाचे महत्वपूर्ण योगदान असून स्वयंसेवकांनी प्रसिद्धीपासून दूर राहत देशाची सेवा केल्याचा दावा त्यांनी केला आहे.