राहुल गांधी हे आता काँग्रेसचे अध्यक्ष असणार आहेत हे पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. मात्र काँग्रेसचे बंडखोर नेते शहजाद पूनावाला यांनी हा दिवस काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसमधील घराणेशाही विरोधात आवाज उठवत आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी हे आवाहन केले. इतकेच नाही तर काँग्रेस घराणेशाहीमुक्त करण्यासाठी अकबर रोड ते अमेठी असे आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हानही देणार आहोत असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांचे अशा प्रकारे अध्यक्ष होणे ही शरमेची बाब आहे असाही ट्विट काही वेळापूर्वीच शहजाद पूनावाला यांनी केला. राहुल गांधी यांना अध्यक्षपद देण्यात यावे म्हणून निवडणूक फिक्स करण्यात आली याचे सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचेही शहजाद पूनावाला यांनी म्हटले आहे.

ज्या दिवशी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी सांभाळतील त्या दिवशी काळे कपडे घालावेत आणि सोशल मीडियातही काळा दिवस पाळण्यात यावा असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. काँग्रेसला घराणेशाहीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे, त्याचमुळे हा निषेध नोंदवण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष असणार आहेत आणि १६ डिसेंबरला सूत्रे स्वीकारतील अशी घोषणा करण्यात आली. ज्यानंतर शहजाद पूनावाला यांनी त्यांचा ट्विटरवरचा डीपी #Black Day या नावाने बदलला आहे.