कुंभमेळ्यातील अखेरच्या शाही स्नानानंतर द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी राम मंदिराच्या निर्माणासाठी रामाग्रह यात्रा काढण्याची घोषणा केली. या यात्रेद्वारे राम मंदिराच्या निर्माणासाठी साधू-संतांसह 17 फेब्रुवारी रोजी अयोध्येकडे कूच करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. 21 फेब्रुवारी शुभमुहूर्त असल्याने यादिवशी मंदिराचा शिलान्यास देखील केला जाईल असं ते म्हणाले.

सोमवारी प्रयागराज येथील मनकामेश्वर मंदिरात माध्यमांशी बोलताना शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, ज्या ठिकाणी रामलल्ला सध्या विराजमान आहेत तिच जागा श्रीरामाची जन्मभूमी असल्याचं अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलंय. न्यायालयाचा निर्णय येऊन नऊ वर्ष उलटलीत, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत नाहीये आणि सरकार म्हणतंय की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचं पालन करु. पण आता अजून धीर ठेवता येणार नाही. या सरकारने राम मंदिराच्या निर्माणासाठीच मत मागितले होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

17 फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथून सुरू होणारी रामाग्रह यात्रा पहिल्या दिवशी प्रतापगड येथून तर दुसऱ्या दिवशी सुल्तानपूर येथून प्रवास करेन. येथे सभांचं आयोजन देखील होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी ही यात्री अयोध्येत पोहोचेल.

काँग्रेसी म्हणून टाळता येणार नाही –
‘काही जणांना माझ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत म्हणून ते मला काँग्रेसी संबोधतात. पण केवळ काँग्रेसी म्हणून आम्हाला टाळता येणार नाही’, असंही ते म्हणाले.

निर्णय बदलेपर्यंत न्यायालयाचा अवमान नाही –
उच्च न्यायालयाने रामलल्लाच्या जागेला श्रीराम जन्मभूमी असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाचा वेगळा काही निर्णय येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी जाण्याने न्यायालयाचा अवमान होत नाही, असं शंकराचार्य म्हणाले.