10 April 2020

News Flash

जातीय शक्तींच्या वाढत्या प्रभावामुळे देशातले वातावरण गढूळ-पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सडकून टीका. यूपीएच्या काळातल्या योजनाच या सरकारने नावे बदलून आणल्याचा आरोप, तसेच शेतकऱ्यांकडे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

देशातले राजकारण चांगल्या वळणावरून वाईट वळणांवर गेले आहे, असे म्हणत राजकारणाच्या सद्यस्थितीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच सत्ताधारी भाजप हा पक्ष मूठभर संघटनांना हाताशी धरून देशातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप शरद पवार यांनी दिल्लीत केला आहे. देशात जातीय शक्तींचा जोर वाढला आहे त्यामुळे वातावरण गढूळ झाले आहे असेही शरद पवारांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या १९ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आज दिल्लीत पार पडला त्यावेळी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा शरद पवार यांनी तिखट शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. गेल्या तीन वर्षात देशाची प्रगती साधण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे, अशीही टीकाही शरद पवार यांनी केली आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून यूपीए सरकारच्या योजनाच नाव बदलून जनतेसमोर आणल्या आहेत. आधार, मनरेगा, डायरेक्ट कॅश या योजनांचा भाजपने विरोधी बाकांवर असताना कडाडून विरोध केला. मात्र आता याच योजना नव्या रूपात लोकांसमोर आणल्या जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशोदेशी जाऊन विविध प्रकारची भाषणे देत असतात. जगात भारताचे स्थान अग्रक्रमावर गेल्याचे दावेही पंतप्रधान मोदी करत असतात. मात्र त्यांनी यूनोच्या रिपोर्टचा अभ्यास केलेला दिसत नाही, अल्पसंख्यांकांवरचे हल्ले रोखण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा उल्लेख या रिपोर्टमध्ये आहे. तसेच देशात सक्तीने धर्मांतर करण्यात येते आहे असेही यूनोच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे असेही शरद पवारांनी पंतप्रधानांना सुनावले आहे.

यंदा देशात डाळींचे भरघोस उत्पादन झाले तरीही निर्यातबंदी मोदी सरकारने वेळेत का उठवली नाही? असाही प्रश्न विचारायला शरद पवार विसरले नाहीत. गेल्या दोन वर्षात रोजगाराच्या २ लाख संधी निर्माण झाल्या. यूपीए सरकारने २००९ या एका वर्षात १० लोकांना रोजगार दिले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न महाराष्ट्रात भिजत पडला आहे. तसेच मध्य प्रदेशातही आंदोलने होत आहेत. मात्र या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडेही सरकार दुर्लक्ष करते आहे,असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. पीक विम्याच्या नावाखाली १६ हजार कोटींचा प्रीमियम भरण्यात आल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. शेतकऱ्यांना मात्र ७ हजार कोटीच मिळाले.. मग पिक विमा हा फक्त विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी वाटला का? असाही सवाल यावेळी पवारांनी उपस्थित केला आहे. एकंदरीतच आज झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळावर टीकेचे आसूड ओढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2017 1:51 pm

Web Title: sharad pawar targets pm narendra modi
Next Stories
1 मध्य प्रदेश: शेतकऱ्यांचे मन वळवण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे उपोषण
2 जम्मू-काश्मीर: लष्कराच्या जवानांनी घुसखोरीचा डाव उधळला; एका दहशतवाद्याचा खात्मा
3 भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बद्रीनाथमध्ये कोसळले, इंजिनीअर ठार, २ पायलट जखमी
Just Now!
X