अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर एक प्रश्न विचारला आहे. ”हो गया. बस. अब?”, असं म्हणत आता पुढे काय असा प्रश्न तापसीने विचारला आहे.

या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालयानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर हिंदूंचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

गेल्या अनेक दशकांपासून रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद सुरु होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर वकिलांच्या एका समूहाने सर्वोच्च न्यायालय परिसरात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. मात्र, अशा घोषणा देणे योग्य ठरणार नसल्याचे इतर काही वकिलांनी सांगितल्यानंतर घोषणा थांबवल्या.