अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अल कायदाच्या दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात खात्मा करण्यात आल्यानंतरही जगाला अजून काही काळ दहशतवादाचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. लिबिया आणि सोमालियामधील दहशतवाद्यांच्या मुसक्या अमेरिकेने आवळल्यानंतर त्यांचा धोका अजून टळलेला नाही, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम देशांमधील कट्टरवाद्यांना एकटे पाडण्यासाठी अमेरिकेला त्या देशांसोबत चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर अमेरिकेतील अशा कट्टरवाद्यांविरोधातही कारवाई करावी लागेल, असे ओबामा यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, अल-कायदा संघटनेशी संबंधित अबू अनस अल लिबी याला अमेरिकेच्या जवानांनी लिबियामधून ताब्यात घेतलंय. अल लिबीने घडवून आणलेल्या स्फोटांमध्ये शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामध्ये अमेरिकी नागरिकांचाही समावेश होता. त्याच्याविरूद्ध आमच्याकडे सबळ पुरावे आहेत. त्याला शिक्षा केली जाईलच.
अमेरिकेच्या जवानांनी गेल्या शनिवारी लिबीला त्रिपोलीमधून ताब्यात घेतले. सध्या तो अमेरिकी लष्कराच्या ताब्यात असून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येते आहे.