रामदेव बाबांचा योगगुरू ते राजकीय प्रवास खूप चित्तवेधक आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात योगासनांचा प्रचार करण्यात त्यांची महत्वपूर्ण भुमिका राहिलेली आहे. इतकेच नव्हे तर रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या उत्पादनाच्या माध्यमातून देशात स्वदेशी अभियानास पुन्हा चालना दिली. रामदेव बाबांच्या जीवनावर आतापर्यंत अनेकांनी भरपूर लिहिले आहे. परंतु रामदवे बाबा इंडिया टूडे या नियतकालिकेचे उपसंपादक उदय महूरकर यांच्या साहाय्याने आपली आत्मकथा लिहिणार आहेत. ‘बिइंग बाबा रामदेव’ असे या पुस्तकाचे नाव असेल. पुढच्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता आहे. या पुस्तकाबाबत प्रकाशक पेंग्विन बुक्स इंडियानेच खुलासा केला आहे.
आपल्या आयुर्वेदिक उत्पादनांनी बाजारात वर्चस्व राखणारे रामदेव बाबा आणि वाद हे नाते जुनेच आहे. मग २०११ मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर केलेले धरणे आंदोलन असेल, अटकेपासून बचावासाठी महिलांचा पोशाख परिधान करून पळण्याचा केलेला प्रयत्न असो. किंवा ‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांचे धड शरीरापासून वेगळे करण्याचे केलेले वक्तव्य असेल. ते कायम चर्चेत असतात.
माध्यमांमधून माझ्या जीवनाबाबत अनेकांनी लिहिले आहे. आता मी स्वत:च माझी आत्मकथा लिहिणार आहे. ही आत्मकथा लिहिताना उदय महूरकर यांची मदत मला मिळणार असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटल्याचे प्रकाशक पेंग्विन इंडियाने सांगितले आहे.
तर सहलेखक उदय महूरकर म्हणाले, मी रामदेव बाबांना २००२ पासून फॉलो करतो. त्यांनी आपली आत्मकथा लिहिण्यासाठी माझी निवड केल्याने आनंद होत आहे. या आत्मकथेत रामदेव बाबांच्या माहीत नसलेल्या बाबी जगासमोर पहिल्यांदाच येतील. योगगुरू ते पतंजली ब्रँडपर्यंतचा त्यांच्या प्रवासाचा या पुस्तकात समावेश असेल.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2016 रोजी प्रकाशित
रामदेव बाबा लिहिणार आत्मकथा; सांगणार योगगुरू ते पतंजलीपर्यंतचा प्रवास
'बिइंग बाबा रामदेव' असे या पुस्तकाचे नाव असेल.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-10-2016 at 11:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The autobiography of yoga guru baba ramdev titled being baba ramdev will be published next year by penguin