मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावाची काल (रविवार) निवड झाल्यानंतर बिहारमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रंगलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र, उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अद्यापही कायमच आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, भाजपाचे तारकिशोर प्रसाद सिंह व रेणुदेवी यांची नावं उपमुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तारकिशोर प्रसाद यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे.

भाजपा नेत्या रेणुदेवी व मी बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ, असे संकेत आहेत. असं भाजपाचे विधिमंडळ नेते तारकिशोर प्रसाद सिंह यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तर, भाजपा नेत्या रेणुदेवी यांना तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहात का? असे विचारले असता, त्यांनी देखील सूचक विधान केलं आहे. ”ही एक मोठी जबाबदारी आहे. जर लोकांनी आमची निवड केली असेल आणि एनडीएवर विश्वास ठेवला असेल, तर आम्ही त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी काम करू” असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील भाजपा नेतृत्वात बदल होत असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्ह दिसत आहेत. तर, माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये स्थान दिलं जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद सिंह यांची भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून निवड झाल्याचं जाहीर केलं होतं. तर, भाजपाच्या विधीमंडळ उपनेतेपदी रेणुदेवी यांची निवड झाल्याबद्दल सुशीलकुमार मोदी यांनी त्यांचे देखील अभिनंदन केले होते.
“माझ्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे आणि मी माझ्या क्षमतेने उत्तम कर्तव्य बजावीन,” अशी प्रतिक्रिया तारकिशोर प्रसाद सिंह यांनी भाजपाचे विधिमंडळ नेते पदावर निवड झाल्यावर दिली होती. तसेच, तुम्ही नितीश कुमार यांचे उपमुख्यमंत्री होणार आहात का? असे विचारण्यात आल्यावर त्यांनी मी आताच यावर काही भाष्य करू शकत नसल्याचे म्हटले होते. तर, रेणुदेवी यांनी देखील आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडणार असल्याचं सांगितलं होतं.