९/११ हल्ल्याच्या युद्धस्मारकाजवळ आयोजित कार्यक्रमात मी आजारी पडले असले तरी तो काही मोठा गंभीर प्रश्न नाही. याच आठवडय़ात आपण पुन्हा प्रचार पुन्हा सुरू करू, असे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी सांगितले. त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले असून, त्याबाबत तर्कवितर्क होत असताना त्यांनी त्यांच्या आरोग्यस्थितीवर पारदर्शकता बाळगून माहिती दिली आहे. ९/११ हल्ल्याच्या १५व्या स्मृतिदिनानिमित्त न्यूयॉर्क येथे आयोजिक कार्यक्रमात त्यांना चक्क उचलून गाडीत ठेवण्याची वेळ आली होती व त्यांचा तोल ढळला होता पण शुद्ध हरपली नव्हती व आता त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे सांगण्यात आले.

सीएनएनला काल रात्री दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की माझ्या आजाराचे काही गंभीर स्वरूप नाही, किंवा ती गंभीर समस्या नाही. कुणाच्याही बाबतीत तसे घडले तर ती व्यक्ती कृतिशील राहून मात करू शकते व पुढे जाऊ शकते. क्लिंटन या आजारी पडल्याने त्यांना कॅलिफोर्नियाचा दौरा रद्द करावा लागला होता. आता अध्यक्षीय निवडणुकीला दोन महिने बाकी असून ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी क्लिंटन आजारी पडल्याची संधी साधून त्यांच्या वैद्यकीय नोंदींची मागणी केली आहे.

क्लिंटन यांच्याबाबतीत असे आजारपण नवीन नाही, नेहमीच त्या आजारी असतात, असा आरोप ट्रम्प यांनी केला. क्लिंटन यांना यापूर्वी कफ झाला होता, त्यामुळे त्यांना क्लिव्हलँड येथे बोलता आले नव्हते. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांना न्यूयॉर्कमधील रुग्णालयात दाखल करावे लागले होते, कारण त्यांना चक्कर आली होती.