जम्मू आणि काश्मीरमधील पीडीपीचा पाठिंबा काढून भाजपाने देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. भाजपाच्या या निर्णयाचा पीडीपीलाही धक्का बसला आहे. भाजपाच्या साथीने आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत सरकार चालवले. पण ज्या पद्धतीने हे घडलं ते आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारे होते. कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती न देता त्यांनी हा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया पीडीपीचे प्रवक्ते रफी अहमद मीर यांनी माध्यमांसमोर दिली. पीडीपीकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया होती.

आता दुपारी चार वाजता आमच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा करू, अशी माहिती मीर यांनी दिली. तत्पूर्वी पीडीपीचे ज्येष्ठ नेते नईम अख्तर यांनी ५ वाजता याबाबत सविस्तर बोलू असे सांगत मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला असल्याची म्हटले.

तत्पूर्वी, केंद्र सरकारने पूर्ण मदत करूनही राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले. काश्मीर खोऱ्यातील स्थिती वेगाने खराब होत गेली. आता राष्ट्रीय सुरक्षा आणि एकता लक्षात घेत आम्ही या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपाचे नेते राम माधव यांनी सांगितले.