देश लुटणाऱ्यांना मोदी घाबरवणारच असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला जनता पुन्हा आम्हालाच संधी देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळो असं सांगत मोदींनी अप्रत्यक्षपणे 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत येईल असं विरोधकांना ठणकावून सांगितलं. हा अहंकाराचा प्रभाव आहे की काँग्रेस 400 हन 40 वर आले आणि सेवभावाचा प्रभाव म्हणून आम्ही 2 हून 200 वर आलो असंही ते यावेळी म्हणाले.

देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा असल्याचा गंभीर आरोप यावेळी नरेंद्र मोदींनी केला. काँग्रेसने जवानांना कमजोर केलं असंही ते म्हणाले. काँग्रेस सरकारने आपल्या सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट, चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत. 2016 साली आम्ही सैनिकांसाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.

मी माझ्या मर्यादेत राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांना सुनावलं आहे. BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला. लोकसभेत 1947 पासूनच्या गोष्टी सांगण्यात आल्या. पण काँग्रेसला वर्ष कळत नाही. त्यांच्या मते BC म्हणजे बिफोर काँग्रेस आणि AD आफ्टर डायनेस्टी. त्यांचं म्हणणंही बरोबर आहे काँग्रेसच्या आधी काहीच नव्हतं आणि जे काही देशाचं झालं आहे ते त्यांच्यामुळेच झालं आहे असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.

नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत सरकारने मिळवलेलं यश सांगितलं. साडे चार वर्षात काय होतं आणि आपण कुठे पोहोचलो आहेत याची तुलना होणार. अर्थव्यवस्था 10,11 व्या क्रमांकावरुन सहाव्या क्रमांकावर पोहोचली. 11 क्रमांकावर पोहोचल्याचा ज्यांना अभिमान होता त्यांना सहाव्या क्रमांकावर आल्याचा अभिमान का नाही ? असा सवाल यावेळी नरेंद्र मोदींनी विचारला.

नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका झालीच पाहिजे. पण मोदी, भाजपावर टीका करता करताना देशाबद्दल वाईट बोलू नका असं यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना सांगितलं. लंडनमध्ये जाऊन खोटी पत्रकार परिषद करण्यात आली अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.

काँग्रेस देशातल्या न्यायसंस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेकडून महाभियोगाची धमकी दिली जाते, योजना आयोगाला प्राणी कमिशन म्हटले जाते. काँग्रेसने लष्कर प्रमुखांना गुंडांची उपमा दिली असं सांगत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली. तुम्ही भारतीय लष्कराच्या मनाला ठेस पोहोचवली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. आपला निवडणूक आयोग जगासाठी उत्तम उदाहरण आहे आहे, त्यामुळे निवडणूक आयोगावर विश्वास ठेवायला हवा असं आवाहन यावेळी विरोधकांना करण्यात आलं.

जेव्हा महाभेसळ असलेलं सरकार असते तेव्हा देशाची अधोगती होते असं सांगत नरेंद्र मोदींनी महागंठबधनवर टीका केली. आमचं सरकार बहुमत असलेलं सरकार आहे, त्यामुळे आमचे सरकार देशवासियांसाठी आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करत आलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचनं आमचं सरकार आल्यावर आम्ही पूर्ण केली असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदींनी विजय मल्ल्याचं नाव न घेता घोटाळा करुन पळून गेलेले ट्विटरवर रडत आहेत असं सांगत विरोधकांना उत्तर दिलं. असा कायदा आम्ही केला. तुम्ही लुटत आहेत त्यांना लुटू दिलंत असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला.

देश बजेटवर चर्चा करत असताना हे ईव्हीएमवर चर्चा करत होते. एवढे का घाबरले आहात…काय झालंय तुम्हाला असा सवाल नरेंद्र मोदींनी यावेळी काँग्रेसला विचारला. तुमची 55 वर्ष आणि माझे फक्त 55 महिने. मोदींकडे बोट करण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा असा टोला त्यांनी यावेळी लगावला.