उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेता योगी आदित्यनाथ आज पश्चिम बंगालच्या बालुरघाट येथे एका रॅलीला संबोधित करण्यासाठी जाणार होते. मात्र, बंगाल सरकारने योगींच्या हेलिकॉप्टर लँडिंगसाठी परवानगी दिली नाही. तसंच योगींच्या रॅलीलाही परवानगी नाकारण्यात आली आहे. पश्चिम बंगाल सरकारने कोणतीही सूचना न देता रॅलीला परवानगी नाकारल्याचं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या पश्चिम बंगालमध्ये चार रॅली होणार होत्या. त्यापैकी आज (दि.३) पुरुलिया आणि बांकुरा येथे दोन रॅली होणार होत्या. याशिवाय 5 तारखेला रायगंज आणि दिनाजपूर जिल्ह्यात दोन रॅली होणार होत्या. पण पश्चिम बंगाल सरकारकडून यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

दुसरीकडे, योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यााची परवानगी दिली नाही, अशी टीका उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या मालदा येथील रॅलीच्या परवानगीवरुनही वादंग झाला होता.