देशात करोना साथीच्या दुसऱ्या लाटेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण महत्वाचे असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. देशात आतापर्यंत १८ कोटीपेक्षा जास्त लोकांना करोना लसीचा डोस देण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतरही करोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे तज्ञ वारंवार सांगत आहेत. अन्यथा संसर्गाचा धोका कायम राहील. दरम्यान, केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी लोकांना कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले.

लस घेतली किंवा नाही पण मास्क आवश्यक

के विजय राघवन म्हणाले, “लस घेतली किंवा नाही, मास्क, सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक आहे. लोकांनी त्यांचे रक्षण बंद करू नये. लोकांनी त्यांचे रक्षण करणे बंद करू नये. आरोग्य यंत्रणेवरील दबाव कमी करण्यासाठीही हे महत्वाचे आहे. वैयक्तिक आणि समुदाय पातळीवर करोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.”

“करोनाची तिसरी लाट रोखू शकत नाही. तिसरी लाट कधी येईल हे माहित नाही. मात्र आपल्याला आधीच तयार राहायला हवे. संक्रमण जसजसे वाढत जाईल तसतसे संक्रमित लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीही वाढेल,” असे केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार म्हणाले.

भारतात आज (शनिवार) करोनाचे नवीन ३,२६,०९८ रुग्ण आढळले. तर ३९८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. तसेच गेल्या २४ तासांत सक्रिय रुग्णांमध्ये ३१००० ने घट झाली आहे.