आपला देश करोनाशी लढाई लढतो आहे, आत्ताच आपल्या देशाला विजयी घोषित ठरणं गैर ठरेल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की इतर देशांशी तुलना मला करायची नाही. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताने योग्य आणि कठोर पावलं उचलून करोनाशी लढा दिला आहे. याबाबत जेव्हा राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी “मला इतर देशांमध्ये काय सुरु आहे त्यावर भाष्य करायचं नाही. एवढंच सांगायचं आहे की आत्ता आपण विजय झाल्याच्या मानसिकतेत जाणं चुकीचं ठरेल”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र ही वेळ मतभेद व्यक्त करण्याची नाही. आम्ही सगळे करोनाच्या लढाईत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत. त्यांना आम्ही सूचना करतो आहोत. त्यांनी आमच्या सूचना ऐकायच्या की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मात्र ही वेळ मतभेद व्यक्त करण्याची नाही तर एकजूट होऊन सगळ्यांनी करोनाशी लढा देण्याची गरज आहे असंही राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

सध्या देश मोठ्या आर्थिक संकटातून जातो आहे. बेरोजगारीचं सावट आणखी गडद होणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी आणखी उपाय योजले पाहिजेत. फक्त लॉकडाउन हा पर्याय नाही. लॉकडाउन हे एखाद्या पॉज बटणासारखे आहे. त्यानंतर जी परिस्थिती उद्भवणार आहे त्याची तयारी सरकारने करायला हवी असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.