स्पेस पर्यटन क्षेत्रातील कंपनी व्हर्जिन गलॅक्टिकने सोमवारी इंजिन उत्पादक रोल्स रॉयससोबत भागीदारी जाहीर केली. आवाजाच्या वेगापेक्षा तीनपट जलद वेगाने उड्डाण करणारी सुपरसॉनिक व्यावसायिक विमाने बनवण्यासाठी या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. माच ३ च्या वेगाने हे विमान उड्डाण करेल.

यापूर्वी कॉनकोर्ड विमाने माच २ च्या वेगाने उड्डाण करायची. १९७६ ते २००३ पर्यंत ही विमाने सेवेमध्ये होती. कुठलेही नवीन सुपरसॉनिक विमान बनवताना कॉनकोर्ड विमानाच्या बाबतीत आवाज आणि इंधनची जी समस्या होती, ती अडचण सोडवावी लागेल. एएफपीने हे वृत्त दिले आहे.

“नव्या हायस्पीड विमानाची प्राथमिक डिझाइन सार्वजनिक करण्यासाठी आम्ही खूपच उत्सुक्त आहोत. ग्राहकांना सुरक्षित, कुठलीही चिंता न करता अप्रतिम हवाई प्रवासाचा अनुभव मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे” असे व्हर्जिन गलॅक्टिक्सचे मुख्य स्पेस अधिकारी जॉर्ज व्हाइटसाइडस म्हणाले.

या विमानाची जी डिझाइन बनवलीय त्यामध्ये त्रिकोणी डेल्टा पंख आहेत. नऊ ते १९ प्रवाशांना घेऊन ६० हजार फूट किंवा १८ हजार मीटर उंचीवरुन हे विमान उड्डाण करु शकते. सामान्य व्यावसायिक विमानापेक्षा या विमानाचा वेग दोन पट जास्त असेल. आता अस्तित्वात असलेल्या धावपट्ट्यांवरच हे विमान उड्डाण आणि लँड करेल.

थर्मल मॅनेजमेंट, देखभाल, आवाज, उत्सर्जन ही या माच ३ विमानाच्या निर्मितीमधील आव्हाने आहेत. त्याशिवाय आर्थिक गणित म्हणजे कुठल्या मार्गावर ही विमाने परवडतील यावर व्हर्जिन गलॅक्टिक्सची टीम अभ्यास करणार आहे. व्हर्जिन गलॅक्टिक्सने या विमानासाठी इंजिन निर्मिती करण्यासाठी रोल्स रॉयससोबत एक सामंजस्य करार केला आहे.