कोणासोबत जायचे, नेमके काय करायचे हे रात्री उशिरा ठरवू असे सूचक वक्तव्य जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी केले आहे. आम्हाला अनेक प्रकराचे सल्ले दिले जात आहेत. त्यापैकी एक राष्ट्रपती भवनासमोर केलेले आंदोलन थांबवण्याचाही होता असेही कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. आता रात्री उशिरा नेमकी काय खलबते होणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपाला १०४ जागा मिळाल्या. तर जेडीएसला ३७ आणि काँग्रेसला ७८ जागा मिळाल्या. निकालाच्या दिवशीच काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी करत त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडिएसचा डाव फसल्यात जमा झाला.

दरम्यान जनता दल सेक्युलरच्या आमदारांना भाजपाने १०० कोटींची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप कुमारस्वामी यांनी केला. तर काँग्रेसनेही भाजपावर गंभीर आरोप केले होते. अशात बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या १५ दिवसात भाजपा घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर करणार असा आरोप काँग्रेसने केला आहे. एकीकडे भाजपाविरोधात काँग्रेस आणि जेडीएस एकवटले असे दिसत असतानाच कुमारस्वामी यांनी सूचक वक्तव्य केले आहे. आता रात्री उशिरा कुमारस्वामी आणि जेडिएसतर्फे काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र हा बहुमताचा आकडा नाही. बहुमत मिळवण्यासाठी भाजपाला ११३ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपा हे अंतर कसे पूर्ण करणार त्यासाठी कोणती राजकीय खेळी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.