पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन तणाव असताना हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. ही सुनावणी चार दिवस चालणार असून भारताच्यावतीने ज्येष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडत आहेत. भारतीय नौदलातील निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने दहशतवाद व हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात हा निर्णय सुनावल्यानंतर भारताने लगेचच मे महिन्यात या निर्णय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. जवळपास तीन वर्षांपासून पाकच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव नेमके आहेत तरी कोण आणि त्यांच्यावरील नेमके आरोप काय याचा घेतलेला हा आढावा…

> कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. कुलभूषण जाधव कमांडिंग ऑफिसर दर्जाचे नौदलातील अधिकारी आहेत व ते भारतातील रॉ साठी काम करत असल्याचा दावा पाकने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोपही पाकने केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकचे म्हणणे होते.

> कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहायक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पूत्र आहेत. ते नऊ वर्षांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झाले होते. कुलभूषण यांचे कुटुंबीय पवई येथील हिरानंदनी भागात राहतात.

> कुलभूषण जाधव यांच्या अटकेच्या महिनाभरानंतर पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी जाधव यांचा एक व्हिडिओ जाहीर केला. यात जाधव हे रॉचे एजंट असल्याची कबुली देताना दिसत होते. कराची आणि बलुचिस्तानमधील दहशतवादी कारवायांसाठी जाळे तयार केल्याची कबुली त्यांनी दिल्याचा दावा पाकने केला होता.

> ४८ वर्षीय कुलभूषण जाधव हे नौदलातील अधिकारी होते. १४ वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. २००३ मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारताने केला होता.

> कुलभूषण जाधव यांनी १९८७ मध्ये एनडीएत प्रवेश केला. १९९१ मध्ये ते भारतीय नौदलाच्या अभियांत्रिकी शाखेत सामील झाले.

> निवृत्ती स्वीकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांनी इराणमधील चाबहार बंदरमधून आयात- निर्यातचा व्यवसाय सुरु केला. कुलभूषण जाधव यांच्याकडे हुसैन मुबारक पटेल या नावाने पासपोर्टही होता. २००३ मधून पुण्यातील पासपोर्ट शाखेतून त्यांनी हा पासपोर्ट मिळवला होता.

> जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते. ते नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत, मात्र त्यांच्याशी सरकारचा संबंध नाही, असे भारताने म्हटले होते. जाधव यांचा पाकिस्तानमधील वास्तव्याचा कोणताही पुरावा देण्यात आला नाही, याकडे भारताने लक्ष वेधले होते.

> पाकिस्तानमधील ‘फील्ड जनरल कोर्ट मार्शल’मध्ये कुलभूषण जाधव यांच्याविरोधात खटला चालला. हेरगिरी आणि घातपाती कारवायांचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी पाकमधील लष्करी न्यायालयाने १० एप्रिल २०१७ रोजी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवले.

> जाधव यांना पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हडेलहप्पी करणाऱ्या पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या प्रकरणात बाजू मांडली होती.

> २०१७ साली डिसेंबर महिन्यामध्ये २२ महिन्यांनतर कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव व पत्नी चेतनकूल जाधव यांच्याशी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये भेट झाली. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटण्याची परवाणगी देण्यात आली होती. यावेळी जाधव यांनी बंद काचेच्या खोलीमधून स्पीकरच्या माध्यमातून त्यांच्या आई व पत्नीशी संवाद साधला होता. यावेळी जाधव यांच्या आईनं अवंती जाधव यांनी मुलासाठी भेटवस्तू आणली होती, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ती भेटवस्तू कुलभूषण यांना दिली नाही.