News Flash

भयंकर! विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार; नराधमांकडून लोखंडी रॉडचा वापर

आधी ४५ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा रुग्णालयात तिथून ८० किमी अंतरावरील दुसऱ्या रुग्णालयात हलवावं लागलं.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. अत्यंत क्रूर पद्धतीने या महिलेवर अत्याचार करण्यात आले. आरोपींनी लोखंडी रॉडचाही वापर केला. मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्यात रविवारी रात्री ही घटना घडली.

बलात्काराच्या या घटनेत पीडित महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. उपचारासाठी तिला दोन रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेची प्रकृती स्थिर असून ती आयसीयूमध्ये आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बलात्काराच्या या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला. राजकीय क्षेत्रातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आणखी एक निर्भया, महिलांवर हल्ले आणखी किती काळ आम्ही सहन करायचे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

काय घडलं?
रविवारी रात्री एका आरोपीने महिलेच्या घरचा दरवाजा ठोठावला. तिने दार उघडल्यानंतर त्याने पाणी मागितले. ती जशी आतल्याबाजूला वळली, आरोपीने लगेच तिला ढकलले व घरात प्रवेश केला. तीन अन्य आरोपी घराजवळच लपले होते. ते सुद्धा घरात शिरले. घटना घडली तेव्हा, पीडित महिलेची छोटी बहिण घरामध्ये होती. चारही आरोपींनी तिच्यासमोरच महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी लोखंडी रॉडचाही वापर केला. पीडित महिलेचे घर एकाबाजूला असल्याने तिने मदतीसाठी केलेली याचना कोणीही ऐकू शकले नाही.

बलात्कारानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पीडित महिलेला सर्वप्रथम आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरने तिला सिधी जिल्हा रुग्णालयात पाठवले, जे आरोग्य केंद्रापासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथल्या डॉक्टरांनी तिला ८० किमी अंतरावर असलेल्या रेवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यास सांगितले. अमीलिया पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने ही माहिती दिली. रेवा येथील रुग्णालयात पीडित महिलेवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिची प्रकृती स्थिर आहे पण तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 4:49 pm

Web Title: widow gang raped by four brutalized with rod in mp sidhi district dmp 82
Next Stories
1 “…तोपर्यंत घरवापसी नाही”; न्यायालयाच्या समितीसमोर जाण्यास शेतकऱ्यांचा नकार
2 शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आहेत, तर मग पुरावे द्या; न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश
3 शेतकरी आंदोलन – सर्वोच्च न्यायालयाकडून चार सदस्यीय समितीची स्थापना
Just Now!
X