scorecardresearch

“आफताब पूनावालाने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिची हाडं मिक्सरमध्ये..” पोलिसांची धक्कादायक माहिती

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे

What Police Said?
नोव्हेंबर महिन्यात वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आफताब पूनावालाने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली. (ANI/Social Media)

आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या प्रेताचे एक-दोन नाही तब्बल ३५ तुकडे केले. श्रद्धाचं शीर कुठे आहे ते अजूनही समजू शकलेलं नाही. पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात आफताबला अटक केल्यानंतर या धक्कादायक घटनेची माहिती जगासमोर आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात ६ हजार ६०० पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. पोलिसांनी हे म्हटलं आहे आफताब मिक्सरमध्ये श्रद्धाची हाडं बारीक करत होता.

काय म्हटलं आहे पोलिसांनी?

आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर स्टोन ग्राईंडरचा वापर करून तो तिच्या हाडांची भुकटी बनवत होता. श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तीन महिन्यांनी तिचे शीर फेकून दिले असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्लीतल्या कुख्यात फ्रिज मर्डर केसमधली ही धक्कादायक कहाणी आता ६६०० पानांच्या आरोपपत्रात समोर आली आहे.

पोलिसांनी आणखी काय काय म्हटलं आहे आरोपपत्रात?

श्रद्धाची हत्या आफताबने १८ मे २०२२ या दिवशी केली. श्रद्धा तिच्या हत्येच्या आदल्यादिवशी तिच्या एका मित्राच्या घरी गेली होती. ती तिच्या मित्राच्या घरीच थांबली होती आणि दुसऱ्या दिवशी घरी आली होती. त्यावरून आफताब आणि श्रद्धा या दोघांमध्ये आधी वादावादी झाली आणि राग अनावर झालेल्या आफताबने श्रद्धाची हत्या केली. तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. यानंतर आफताबने झोमॅटोवरून चिकन रोल मागवला होता आणि तो त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर खाल्ला असंही पोलिसांनी चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.

श्रद्धा आणि आफताबचं नातं आणि सततचे खटके

श्रद्धा वालकर आणि आफताब पूनावाला हे दोघंही मागच्या वर्षी म्हणजेच मे महिन्यात दिल्लीला शिफ्ट झाले होते. मात्र त्यांच्या नात्यात ऑल इज नॉट वेल होतं. कारण त्यांच्यात सातत्याने विविध कारणांवरून वाद होत असत. आफताब पूनावाला हा अनेक मुलींशी संबंध ठेवून होता. दिल्ली ते दुबई त्याच्या गर्लफ्रेंड होत्या असंही पोलिसांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

१८ मे २०२२ ला श्रद्धा आणि आफताबने मुंबईला जायचं ठरवलं होतं. पण नंतर आफताबने अचानक ही तिकिटं रद्द केली. कारण या दोघांचं रोजच्या खर्चावरून भांडण झालं. तसंच श्रद्धा तिच्या मित्राकडे गेली होती त्यावरूनही या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा दाबून तिची हत्या केली.

प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून आफताब फेकणार होता श्रद्धाचा मृतदेह

आरोपपत्रात हे म्हटलं आहे की श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मृतदेह प्लास्टिकच्या मोठ्या बॅगमध्ये बांधून त्याची विल्हेवाट लावण्याचा विचार केला होता. मात्र आपण यामुळे पकडले जाऊ हे त्याला वाटलं त्यामुळे आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आफताबने बाजारातून करवत, हातोडी आणि तीन चाकू विकत घेतला. ब्लो टॉर्चने त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे बोटं वेगळी केली. यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर आफताब हळूहळू पिशव्यांमधून घेऊन जात तो हे तुकडे फेकत होता. त्यावेळी आफताबला भेटायला त्याच्या गर्लफ्रेंड्सही दिल्लीतल्या त्याच्या घरी येत होत्या असाही उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे

आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिचा मोबाइल आपल्याजवळ ठेवला होता. Google च्या डेटावरून हे स्पष्ट झालं आहे की तिचा फोन १८ मे नंतरही अॅक्टिव्ह होता. आफताबने नंतर मुंबईत येऊन श्रद्धाचा मोबाइल आणि लिपस्टिक यांची विल्हेवाट लावली.आफताबने नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आरोपपत्रात या सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 19:10 IST