संसदीय अधिवेशनादरम्यान, लोकसभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तसेच या तीनपैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे. याबद्दलची माहिती देताना अमित शाह लोकसभेत म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर आमचंच आहे. पाकव्याप्त काश्मीरसाठी भारताने जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत २४ जागा राखीव ठेवल्या आहेत. लोकसभेत “जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक” आणि “जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) विधेयक” या दोन विधेयकांवर चर्चा झाल्यानंतर अमित शाह यांनी ही घोषणा केली. तसेच पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलत असताना अमित शाह यांनी भारताचे पहिलं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. पंडित नेहरू यांच्याकडून झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्षं खूप काही भोगावं लागलं आहे, असा दावा अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.
अमित शाह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पलटवार केला आहे. चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना खूप हिंमतवान म्हणत एक आव्हानही दिलं आहे. चौधरी म्हणाले, तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमधून एक सफरचंद आणून दाखवा. तुमच्यात हिंमत असेल तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीर हिसकावून घ्या. तसं केलंत तर संपूर्ण देशातली मतं भाजपाला मिळतील.
अधीर रंजन चौधरी म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत एक संपूर्ण दिवस चर्चा व्हायला हवी. हा काही छोटा वाद नाही. देशातल्या जनतेला याचं गांभीर्य आणि खोली माहिती असली पाहिजे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून मोदी आणि शाह पीओके घेण्याच्या घोषणा करतायत. मोदी सरकारला १० वर्ष होत आली. अटल बिहारी वाजपेयी यांचं सहा वर्षे सरकार होतं. या १६ वर्षांमध्ये पाकव्याप्त काश्मीर घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं होतं?
हे ही वाचा >> “प्रश्न इतकाच आहे की भाजपासाठी हिंदुत्व…”, ठाकरे गटाचा संसदेतील ‘त्या’ प्रकारावरून हल्लाबोल!
अमित शाह यांनी बुधवारी (६ डिसेंबर) लोकसभेत केलेल्या भाषणात भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ देत पंडित नेहरूंवर निशाणा साधला होता. नेहरूंच्या काळात झालेल्या चुकांमुळे काश्मीरला भोगावं लागलं. शाह म्हणाले, मी या सभागृहात उभा राहून जबाबदारीने बोलतोय की पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी केलेल्या दोन चुकांमुळे पुढची अनेक वर्षं काश्मीरला खूप काही भोगावं लागलं आहे. भारत-पाकिस्तान युद्धात आपले सैनिक जिंकत होते. परंतु, पंजाबचा भाग आपल्या ताब्यात येताच नेहरू यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. नेहरूंनी तीन दिवस उशीरा युद्धबंदी केली असती, तर आज पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग असता. त्यानंतर नेहरू यांनी आणखी एक चूक केली. त्यांनी भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला.