Air India Office Party: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनसाठी उड्डाण घेतलेल्या एआय-१७१ या विमानाचा भीषण अपघात होऊन २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संबंध देशात हळहळ व्यक्त केली गेली. मात्र दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी पार्टी केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आता एअर इंडियाच्या विमानतळ सेवा व्यवस्थापन कंपनीने (AISATS) मोठी कारवाई केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी अपघाताच्या दुसऱ्या दिवशी नाचगाणे करून जल्लोष केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

सिंगापूर स्टॅट्स लिमिटेडबरोबर ग्राउंड-हँडलिंग संयुक्त उपक्रम असलेल्या एअर इंडियाच्या AISATS या कंपनीचे कर्मचारी कार्यालयात पार्टी करताना एका व्हिडीओमध्ये दिसले. सदर व्हिडीओ नेमका कोणत्या तारखेचा आहे, यावर कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र १२ जूनच्या अपघातानंतर कार्यालयात पार्टी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

एआयएसएटीएसच्या गुरुग्राम येथील कार्यालयात ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, एअर इंडियाचे विमान एआय-१७१ चा दुर्दैवी अपघात होऊन यात बाधित झालेल्या कुटुंबियांप्रती एअर इंडिया समूह संवेदना व्यक्त करत आहे. आमच्या कार्यालयातील व्हिडीओबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.

चार ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

प्रवक्त्यांनी पुढे म्हटले की, कर्मचाऱ्यांचे वर्तन कंपनीच्या मूल्यांशी जुळणारे नव्हते. त्यामुळे आम्ही शिस्तभंगाची कारवाई करत आहोत. जे लोक या पार्टीसाठी जबाबदार होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चार ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला असून इतर कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली आहे.

स्टॅट्स लिमिटेड यांच्याबरोबर ५०-५० टक्के भागिदारीत टाटा समूहाची AISATS ही कंपनी काम करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१२ जून रोजी अहमदाबाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनसाठी एआय-१७१ या विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र अवघ्या काही सेकंदात विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ प्रवाशी मृत्यूमुखी पडले. तर ज्याठिकाणी विमान कोसळले होते, तेथील ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.