Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार ते देखील आजच ठरणार आहे. अरविंद केजरीवाल उपराज्यापलांकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवतील.

राजीनामा देणार असल्याचं रविवारीच जाहीर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून बाहेर येताच आपण दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहोत असं जाहीर केलं. आता अरविंद केजरीवाल ही जबाबदारी कुणाला देणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पक्षात कुठलाही वाद किंवा संघर्ष होऊ नये म्हणून केजरीवाल यांनी सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत पक्षातल्या नेत्यांशी एक-एक करुन चर्चा केली.

सौरभ भारद्वाज यांनी काय सांगितलं?

आपचे नेते आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार सौरभ भारतद्वाज यांनी सांगितलं की आमची बैठक पार पडली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत नेत्यांशी एक-एकट्याने चर्चा केली. आता आज आमदारांची बैठक घेतली जाईल. या बैठकीत चर्चा होईल. सकाळी ११ वाजता ही बैठक सुरु होईल जी दुपारी ४ वाजेपर्यंत चालेल असा अंदाज आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार? यावर चर्चा केली जाणार आहे. दुपारी ४.३० ला उपराज्यपालांनी अरविंद केजरीवाल यांना भेटीची वेळ दिली आहे. त्यावेळी ते त्यांचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द करतील. त्याआधी म्हणजेच केजरीवाल उपराज्यपालांकडे जाण्याआधी दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय होईल.

हे पण वाचा- विश्लेषण: केजरीवाल यांच्या घोषणेने भाजपची अडचण? मुदतपूर्व निवडणुकीमागे आत्मविश्वास की जुगार?

आतिशी आणि सौरभ भारद्वाज रेसमध्ये?

अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सौरभ भारद्वाज आणि आतिशी या दोन नेत्यांची नावं या पदांसाठी चर्चेत आहेत. सध्याच्या घडीला सर्वाधिक खाती असलेले हे दोन मंत्री आहेत त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनीता केजरीवाल यांच्याकडे पद का नाही?

सुनीता केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील अशा चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुनीता केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत कारण त्या आमदार नाहीत. तसंच दिल्लीत एकच सभागृह आहे. जर सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री केलं तर पुढच्या सहा महिन्यात त्यांना आमदार म्हणून निवडून यावं लागेल. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच आहे. त्यामुळे सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री केलं तर पक्षाच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.