Libiya Flood Update : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे धरण फुटल्याने लिबियातील पूर्वेकडील डेर्ना शहरात पाच हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूमध्य समुद्रातील डॅनीएल वादळामुळे रविवारी रात्री ढगफुटी होऊन प्रलयकारी पूर आला. त्यामुळे पूर्व लिबियाच्या अनेक शहरांत मोठा विध्वंस झाला. त्यापैकी सर्वाधिक हानी डेर्ना शहरात झाली आहे. आपत्कालीन विभागाकडून दोन हजार मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.
आपत्तीला ३६ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर मंगळवारी डेर्ना येथे बाहेरील मदत पोहोचण्यास सुरुवात झाली. पुरामुळे किनारपट्टीजवळी शहरांमधील रस्ते खराब झाले आहेत. बुधवारी सकाळपर्यंत दोन हजारांहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक मृतदेह डेर्ना येथील सामूहिक कबरीत दफन करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर आणि ढिगाऱ्याखाली अडकलेले इतर अनेक मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथके रात्रंदिवस काम करत आहेत. काही मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पूर्वेकडील लिबियाचे आरोग्यमंत्री ओथमान अब्दुलजलील यांनी दिली.
हेही वाचा >> निपाहचा धोका वाढला; ‘या’ राज्यातील गावे कंटेनमेंट झोनमध्ये, शाळा- कार्यालये बंद!
किमान पाच हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, अशीही माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. पूर्व लिबियाच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद अबू-लामोशा यांना सांगितले की, एकट्या डेर्ना येथे पाच हजार ३०० हून अधिक लोक मरण पावले आहेत. डेर्नाच्या रुग्णवाहिका प्राधिकरणाने २३०० मृतांची माहिती दिली.
किमान दहा हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर, ४० हून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, अशी माहिती इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीजचे लिबियाचे दूत तामेर रमजान यांनी दिली.
नियोजन नाही, पूनर्वसन नाही
डॅनिएल वादळाची पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचं काही स्थानिकांचं म्हणणं आहे. धरण फुटण्याचा आवाज आला तेव्हा या संकटाची माहिती झाली. त्यामुळे नागरिकांच्या पूनर्वसनाचीही सोय करण्यात आली नसल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.
या शहरांत हानी
डेर्ना, बायदा, सुसा, मर्ज आणि शाहत. ईशान्य लिबीया हा देशाचा सर्वाधिक सुपीक आणि हरित प्रदेश आहे. बायदा, मर्ज आणि शाहत ही शहरे वसलेला जबल अल अखदर हा भाग देशात सर्वाधिक सरासरी पर्जन्यवृष्टी होणाऱ्या प्रदेशांपैकी आहे.
दोन धरणे फुटल्याने विध्वंस
पूर्व लिबीयाचे पंतप्रधान ओसामा हमद म्हणाले की, दोन धरणे फुटल्याने आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले आहेत. डेर्ना शहरात झालेली हानी भरून काढणे हे या देशाच्या क्षमतेबाहेरचे काम आहे.
देशात दोन सरकार
वर्षानुवर्षे सुरू असलेले युद्ध, केंद्र सरकारचा अभाव यामुळे लिबियात पायाभूत सुविधाही नाहीत. परिणामी वादळामुळे आलेल्या पाऊस आणि पुराचा फटका देशाला बसला आहे. तसंच, लिबिया दोन सरकारांमध्ये विभागला गेला आहे. अब्दुल हमी डबेबा हे लिबियाच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्रप्त सरकारचे प्रमुख आहेत. तर, ओसामा हमद हे पूर्वेकडील प्रशासनाचे प्रमुख आहेत. यांना लष्करी कमांडर खलिफा हिफ्तार यांचा पाठिंबा आहे.