अतिउंचावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा!

हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो.

 

रोहतंग, हिमाचल प्रदेश : पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन शनिवारी केले, तो समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे. मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.

हा बोगदा ९.०२ कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. आता सर्व हवामानात ही वाहतूक सुरू राहील, एरवी सहा महिने हिमवृष्टीमुळे  या भागाचा संपर्क इतर देशापासून तुटत  होता. पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे. दक्षिण पोर्टल मनालीपासून २५ कि.मी अंतरावर व ३०६० मीटर उंचीवर आहे. उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ ३०७१ मीटर उंचीवर आहे. घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला ३३०० कोटी रुपये खर्च आला आहे.

अटलजींच्या मित्राचे स्वप्न पूर्ण

थोलांग, हिमाचल प्रदेश : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे मित्र अर्जुन गोपाल यांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतून बोगदा बांधल्यास सोयीचे होईल, अशी सूचना काही वर्षांपूर्वी केली होती.  गोपाल यांचे पुत्र अमर सिंह (वय ७५) यांनी सांगितले, की आमचे वडील १९९८ मध्ये दिल्लीत वाजपेयी यांना भेटले होते. त्या वेळी त्यांनी रोहतांग खिंडीतून बोगदा केल्यास लाहौल-स्पिती जिल्ह्य़ातील लोकांची सोय होईल अशी कल्पना मांडली. त्यानंतर माझे वडील २००८ मध्ये निवर्तले, आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Atal tunnel longest mountain tunnel longest highway tunnel in himachal pradesh zws