बऱ्याच दिवसांनी किंवा महिन्यांनी जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता तेव्हा त्यांच्यासोबत सेल्फी काढून तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट करता. मैत्रीची एक गोड आठवण तसेच जगाला तुमच्या मैत्रीबद्दल सांगण्याचा हेतू त्यामागे असतो. दोन देशांचे प्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा ते सुद्धा परस्परांसोबत सेल्फी काढून अशाच पद्धतीने आनंद व्यक्त करतात.

जपानमध्ये सुरु असलेल्या जी २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. त्यावेळी दोघांनी त्या क्षणाची आठवण म्हणून परस्परांसोबत एक सेल्फी फोटो काढला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी हा फोटो टि्वट केला असून त्याला ‘कितना अच्छा हे मोदी’ हे कॅप्शन दिले आहे.

पंतप्रधान मोदींनीही मॉरिसन यांचे टि्वट रिटि्वट करत आपल्या द्विपक्षीय संबंधांची ऊर्जा पाहून मी उत्साहित झालो आहे असे म्हटले आहे. जपान ओसाकामध्ये सुरु असलेल्या जी २० परिषदेत पंतप्रधान मोदींनी शनिवारी इंडोनेशिया आणि ब्राझीलच्या पंतप्रधानांची स्वतंत्र भेट घेतली. व्यापार, गुंतवणूक आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. काल शुक्रवारी बैठकीच्या पहिल्यादिवशी मोदींनी अमेरिका, चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा केली.