बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानला ठार करण्याचा एक कट उघड झाला आहे. या कटात बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे हे देखील समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बिश्नोई गँगने सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचला होता. पाकिस्तानातून हत्यारं पुरवणाऱ्या एका माणसाकडून हत्यारंही मागणवण्याचीही योजना आखण्यात आली होती. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात गु्न्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे.
काय होता नेमका कट?
नवी मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सलमान खानच्या कारवर पनवेलमध्ये हल्ला करण्याची योजना लॉरेन्स बिश्नोई गँगने आखली होती. बिश्नोईचा मोठा भाऊ अनमोल आणि त्याचा साथीदार गोल्डी ब्रार या दोघांनी पाकिस्तानच्या एका बेकायदा शस्त्र विक्रेत्याकडून एके ४७, एम १६ यांच्यासह अत्याधुनिक बंदुका खरेदी केल्या होत्या आणि त्या महाराष्ट्रात पाठवून त्याच्या कारवर हल्ला करुन त्याला ठार करण्याची योजना आखण्यात आली होती. सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर जो हल्ला झाला, त्याआधी बिश्नोई गँगने हा कट आखला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- Pune Porsche Accident: सलमान खान हिट अॅण्ड रन केस आणि पुणे पोर्श कार अपघात; साम्य-भेद कोणते?
सलमान खानचं फार्म हाऊसही टार्गेटवर
पोलिसांना ही माहितीही मिळाली आहे की सलमान खानच्या कारवर किंवा त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर हा हल्ला होणार होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आता ही माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांचं हे म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून ही माहिती मिळाली की सलमान खानच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी त्याच्या कारवर हल्ला होणार होता. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात एकूण चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून या प्रकरणाची अधिक चौकशी केली जाते आहे.
घरावरच्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढवली
अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडमध्ये भाईजान आणि दबंग खान या नावाने ओळखला जातो. सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावर गोळीबार झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सलमान खानची भेट घेतली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून याआधीही असा प्रयत्न झाला आहे. तसंच सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याची सुरक्षा सरकारने वाढवली होती. आता या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे त्यांच्याकडून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कटाची ही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सलमान खानच्या कारवर किंवा पनवेल येथील फार्म हाऊसवर हल्ला करण्यात येणार होता असं कळतं आहे. आणखी काय काय माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर येते ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.