नवी दिल्ली : हरियाणात एलनाबाद विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला असला तरी, उमेदवार गोविंद कांडा यांनी पक्षासाठी येथे मोठ्या प्रमाणावर मते मिळवली आहेत. या पोटनिवडणुकीकडे शेतकरी आंदोलनाचे शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले गेले; पण शेतकरी नेत्यांमधील मतभेदांमुळे आता आंदोलनावर दबाव वाढला आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून भारतीय राष्ट्रीय लोकदल (आयएनएलडी) पक्षाचे आमदार अभय चौताला यांनी राजीनामा दिला होता; पण अभय चौताला यांनी पोटनिवडणूक लढवली. त्यांनी ६७३९ मताधिक्याने एलनाबाद मतदारसंघ कायम राखला आहे. या वेळी त्यांना ६५ हजार ८९७ मते मिळाली. ही मते २०१९च्या निवडणुकीतील मतांपेक्षा आठ हजारांहून जास्त आहेत. भाजपच्या गोविंद कांडा यांना ५९ हजार १८९ मते मिळाली, ती गेल्या वेळी भाजपच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा दोन हजारहून अधिक आहेत. त्यामुळे भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव झाला असला तरी येथे पक्षाला आतापर्यंतची सर्वाधिक मते मिळाली आहेत. काँग्रेसचे पवन बेनिवाल यांना २० हजार ६८२ मते मिळाली, तुलनेत २०१९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला ३५ हजार ३८३ मते मिळाली होती. काँग्रेसची कमी झालेली मते ‘आयएनएलडी’ आणि भाजपच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘चौताला जिंकले असले तरी त्यांचा नैतिक पराभव झाला आहे’, अशी प्रतिक्रिया हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी व्यक्त केली.

या मतदारसंघात शेतकरी आंदोलनातील राकेश टिकैत, गुरुनाम चढूनी आदींनी भाजपविरोधात प्रचार केला होता, मात्र टिकैत यांनी ‘आयएनएलडी’, तर चढूनी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे समर्थन केले होते. त्यामुळे शेतकरी नेत्यांचा प्रचारही जाट आणि शीख मतदारांमध्ये विभागला गेल्याचे सांगितले जाते. शेतकरी आंदोलनाचा प्रभाव पोटनिवडणुकीत दिसला असता तर चौताला मोठ्या मताधिक्याने जिंकले असते, असे गृहमंत्री वीज यांचे म्हणणे आहे.

२०१९ मध्ये चौताला ११ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. काँग्रेसने उमेदवार रिंगणात न उतरवता ‘आयएनएलडी’ला पाठिंबा दिला असता तर, मताधिक्यात वाढ झाली असती, असे चौताला यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री वीज यांनी शेतकरी आंदोलनाचा पोटनिवडणुकीवर परिणाम झाला नसल्याचा दावा केला असला तरी, हरियाणा, हिमाचल प्रदेशमधील भाजपचा पराभव हा केंद्राला शेतकऱ्यांनी दिलेला स्पष्ट संकेत असल्याचे ‘संयुक्त किसान मोर्चा’च्या निवेदनात म्हटले आहे.