मोदी आडनावावरून केलेल्या विधानानंतर सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. दरम्यान, यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचं एक जुनं ट्वीट प्रचंड व्हायरल होत असून काँग्रेसने यावरून भाजपावर लक्ष केलं आहे.
हेही वाचा – VIDEO : “माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे; मी माफी मागणार नाही”, राहुल गांधींचं भाजपाला प्रत्युत्तर
खुशबू सुंदर यांचं ट्वीट नक्की काय होतं?
खुशबू सुंदर यांनी २०१८ मध्ये काँग्रेस पक्षात असताना पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. इथे मोदी, तिथे मोदी, जिकडे बघावं तिकडे मोदी, पण मोदी म्हणजे नेमकं काय? प्रत्येक मोदी नावाच्या पूर्वी भ्रष्टाचार शब्द लिहिला जातो. मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले होते.
काँग्रेसचा भाजपावर निशाणा
दरम्यान, राहुल गांधींवरील कारवाईनंतर खुशबू सुंदर यांचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल होत असून यावरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केलं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी आता आपल्या मोदी नावाच्या शिष्याद्वारे खुशबू सुंदर यांच्यावर मानहानीचा दाखल करतील का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?” या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता. दरम्यान, याप्रकरणी काल राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. त्यांनी राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं