काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थान येथील प्रचार सभेत जनतेला संबोधित करताना पनवती असा शब्द वापरला. अहमदाबादमधील स्टेडिअममध्ये बसलेल्या पनवतीमुळे आपण वर्ल्ड कप २०२३ जिंकू शकलो नाही, असं राहुल गांधी म्हणाले. यावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर, आता भाजपाने थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना रविवारी (१९ नोव्हेंबर) पार पडला. हा सामना पाहण्याकरता देशभरातील क्रिकेटप्रेमी अहमदाबाद येथे आले होते. तसंच, अनेक राजकीय, सेलिब्रिटी मंडळीही येथे उपस्थित होते. नरेंद्र मोदी स्टेडिअम क्रिकेटप्रेमींनी खचाखच भरलं होतं. भारतीय क्रिकेट संघाला चिअर अप केलं जात होतं. परंतु, भारतीय क्रिकेट संघाचा खेळ कमकुवत ठरल्याने ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. संपूर्ण विश्वचषक २०२३ मध्ये चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात नांगी टाकल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. संघातील सदस्यांच्या सामन्यातील अनेक चुका सांगितल्या जात आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली. “आपला भारतीय क्रिकेट संघ चांगला खेळत होता. आपण जिंकलो असतो, पण पनवतीने त्यांना हरवलं”, असं राहुल गांधी म्हणाले. यामध्ये राहुल गांधींनी कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतु, भाजपाने यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून भाजपाने प्रत्युत्तरही दिलं. तसंच, आता निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन राहुल गांधींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवरून त्यांनी माफी मागावी अशी भाजपाने मागणी केली. भाजपाचे नेते रवी शंकर यांनी टाईम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की, तुम्हाला काय झालंय राहुल गांधी? तुम्ही देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरत आहात. आपल्या पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांचं मनोबल उंचावलं. हरणं आणि जिंकणं हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे.
“तुम्ही तुमच्या इतिहासातून शिकलं पाहिजे. तुमच्या आई सोनिया गांधी मोदींना मौत का सौदागर म्हणायच्या आणि आता काँग्रेसची अवस्था काय झाली आहे बघा”, असंही रवी शंकर प्रसाद म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या टीप्पणीमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तसंच, कोर्टाने त्यांना शिक्षाही सुनावली होती. यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे, हे प्रकरणही न्यायालयाच्या दारात गेल्यास त्यांची खासदारकी पुन्हा धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
