Nishikant Dubey vs SY Quraishi : “देशात सुरू झालेल्या यादवी युद्धासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार आहेत”, असं वक्तव्य भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठं राजकीय वादंग उठलेलं असतानाच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दुबे रविवारी (२० एप्रिल) एस. वाय. कुरैशी यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, “तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हे तर केवळ मुस्लीम आयुक्त होता.” कुरैशी यांनी वक्फ सुधारणा कायद्याचा निषेध नोंदवला होता. त्यावरून दुबे यांनी कुरैशींवर हल्लाबोल केला आहे.

वक्फ कायदा म्हणजे मुसलमानांची जमीन बळकावण्यासाठी सरकारने आणलेली भयानक योजना असल्याची टिप्पणी कुरैशी यांनी केली होती. वाय. एस. कुरैशी हे भारतीय निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त आहेत. कुरैशी यांच्यावर टीका करण्याच्या एक दिवस आधी दुबे यांनी भारताच्या सरन्यायाधीशांवर हल्लाबोल केला होता. भारतातील यादवी युद्धासाठी सरन्यायाधीश संजीव खन्ना जबाबदार असल्याचं दुबेंनी म्हटलं होतं. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने दुबेंच्या वक्तव्यापासून अंतर राखलं आहे.

कुरैशी यांचे सरकारवर आरोप

कुरैशी यांनी १७ एप्रिल रोजी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की “वक्फ कायदा निःसंशयपणे मुस्लिमांची जमीन बळकावण्यासाठीची सरकारची भयानक योजना आहे. मला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालय यावर प्रश्न उपस्थित करेल. भाजपाच्या अपप्रचार व्यवस्थेने चुकीची माहिती पसरवण्याचं त्यांचं काम उत्तमपणे केलं आहे.”

निशिकांत दुबेंचा कुरैशींवर हल्लाबोल

कुरैशी यांच्या या वक्तव्यावर भाजपा खासदार दुबे यांनी टिप्पणी केली होती. दुबे म्हणाले, “तुम्ही निवडणूक आयुक्त नव्हे तर मुस्लीम आयुक्त होता. तुमच्या कार्यकाळात झारखंडमधील संथाल परगना जिल्ह्यात असंख्य बांगलादेशी घुसखोरांना भारतीय मतदार बनवलं गेलं. मोहम्मद पैगबंर यांचा इस्लाम ७१२ साली भारतात आला. त्याआधी ही भूमी (वक्फ) हिंदू, आदिवासी, जैन व बौद्धांची होती.

दुबे म्हणाले, “आपण या देशातील लोकांची एकजूट वाढवली पाहिजे. देश एकजुट करा, इतिहास वाचा. या देशाचे दोन तुकडे करून पाकिस्तान जन्माला आला आहे. आता पुन्हा एकदा देशाची फाळणी होणार नाही.”