Crime News : एक आदिवासी महिला आणि तिच्या तीन मुलांना बंधपत्रित मजूर म्हणून अडकवून ठेवणार्या तिरूपती येथील एका बदक पालन करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना अटक करण्यात आली आहे. तसेच या कुटुंबावर २५ हजार रूपयांच्या कर्जाच्या बदल्यात तारण म्हणू स्वत:कडे ठेवून घेतलेल्या मुलाला गुपचूप दफन केल्याचा देखील आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अनकम्मा ही यानादी आदिवासी समुदायातील आहे. आरोपींकडून २५ हजार रुपयांचे कर्ज घेतल्यापासून त्या आणि पती चेंचैया यांच्याबरोबर तीन मुले अशा संपूर्ण कुटुंबाने त्यांच्यासाठी काम करायला सुरूवात केली. दरम्यान महिलेचा पती चेंचैया यांच्या मृत्यूनंतर त्यांना कर्ज देणाऱ्याने जोपर्यंत ते वाढून ४५,००० रुपये झालेले कर्ज (२०,००० रुपये व्याज) परत करत नाहीत तोपर्यंत त्यांना सोडण्यास नकार दिला असे सांगितले जात आहे.
खूप विनंती केल्यानंतर अनकम्मा यांना त्या कर्जाची परतफेड करत नाहीत तोपर्यंत एक मुलाला मागे ठेवलं तरच जाऊ दिले जाईल असे सांगण्यात आले. दुसरा पर्याय नसल्याने त्या यासाठी तयार झाल्या.
त्यांच्या एका मुलाला आरोपीबरोबर ठेवण्यात आले. त्यानंतर तो मुलगा अधूनमधून फोनवर संपर्क करत असे आणि कामाची वाईट परिस्थिती आणि शिवीगाळ होत असल्याचे सांगून लवकर सुटका करण्याची विनंती करत असेय
आई आणि मुलगा यांच्यातील शेवटचे संभाषण हे १२ एप्रिल रोजी झाले. एप्रिल महिन्याच्या शेवटी पैशांची व्यवस्था केल्यानंतर अनाकम्मा या त्यांच्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आल्या.
मात्र बदक पालन करणारा आणि त्याच्या कुटुंबाकडून त्यांना टाळाटाळ करत स्पष्टीकरण देण्यात आले. पहिल्यांना आरोपींनी दावा केला की त्याला पाठवून देण्यात आलं आहे. नंतर त्यांनी अनकम्मा यांना सांगितले की त्यांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि शेवटी त्यांनी दावा केला की तो पळून गेला आहे.
काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने स्थानिक आदिवासी नेत्याशी संपर्क साधला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या चौकशीत बदक पालन करणाऱ्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे आणि त्याला तामिळनाडूमधील कांचिपुरम येथील त्याच्या सासऱ्याच्या घराजवळ गुपचूप पुरल्याचे कबूल केले.
प्रशासनाने अनाकम्मा यांच्या उपस्थितीत मुलाचा मृतदेह बाहेर काढला. तिरूपती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व्यंकटेश्वर यांनी मुलाला रुग्णालयात नेण्यात आल्याची पुष्टी केली. तसेच त्यांनी मुलाला कावीळ झाल्याची शक्यता देखील व्यक्त केली.
मात्र मुलाला गुपचूप पुरल्याने आणि याबद्दल कुटुंबियांना न कळवण्यात आल्यामुळे मुलाच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान बदक पालन करणारा व्यक्ती त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलाविरोधात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.