Brazil Eyes Akash Air Defence System After Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने सीमेलगतच्या भारतीय शहरांवर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. ते हल्ले भारताने यशस्वीपणे परतावून लावले होते. यामध्ये भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यानंतर त्यांची जगभरात चर्चा झाली होती.

अशात, पुढील आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण अमेरिकन देशाच्या नियोजित दौऱ्यापूर्वी, ब्राझीलने भारताची आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि गरुड तोफा यासह इतर संरक्षण प्रणाली खरेदी करण्यात रस दाखवला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव पी. कुमारन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ब्राझीलसोबत संरक्षण सहकार्य आणि ते वाढवण्यावर चर्चा होणार आहे. आम्ही संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण देवाणघेवाणीचे प्रयत्न करत आहोत. कोणत्या प्रकारचे सहकार्य शक्य आहे, ब्राझीलला कोणत्या प्रकारच्या संरक्षण प्रणाली विकता येतील याबद्दल आम्ही अजूनही चर्चा करत आहोत, परंतु यामध्ये अद्याप फारशी प्रगती झालेली नाही.”

“काही गोष्टींमध्ये ब्राझीलला मोठ्या प्रमाणात सर आहे. त्यांना युद्धभूमीवर सुरक्षित संपर्क प्रणालींमध्ये रस आहे. त्यांना ऑफशोअर पेट्रोलिंग व्हेसल्समध्ये देखील रस आहे. ब्राझीलकडे स्कॉर्पिन पाणबुड्या आहेत. त्यांना त्या पाणबुड्यांच्या देखभालीसाठी आमच्यासोबत भागीदारी करण्यात रस आहे. त्यांना आकाश हवाई संरक्षण प्रणाली आणि गरुड तोफा इत्यादींमध्ये देखील रस असल्याचे दिसते,” असे ते पुढे म्हणाले.

ब्राझीलला भारतासोबत संरक्षण उद्योग संयुक्त उपक्रमातही रस आहे. “म्हणून एम्ब्रेअर आणि सर्वसाधारणपणे विमान उद्योगात ब्राझीलची ताकद पाहता, त्यांच्यासोबत काम करण्याची आम्हाला खूप संधी आहे,” असे पुढे कुमारन म्हणाले.

भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेली आकाश क्षेपणास्त्र प्रणाली ही एक मध्यम पल्ल्याची, फिरती जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. जी लढाऊ विमाने, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हवेतून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे यासह विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना रोखण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रणालीचा पल्ला २५–४५ किमी आहे आणि २० किमी पर्यंत उंचीवरील लक्ष्यांना ती लक्ष्य करण्यास सक्षम आहे. तिचा सुपरसॉनिक वेग मॅक १.८ ते २.५ इतका आहे.