‘चंद्रा’ने शोधला आकाशगंगेबाहेरील ग्रह

आपल्या आकाशगंगेपासून दोन कोटी ८० लाख प्रकाशवर्ष अंतरावरील Messier 51 या दिर्घिकेत ‘चंद्रा’ या अवकाश दुर्बिणीने ग्रहाचे अस्तित्व शोधले आहे

Messier 51

नासाच्या ‘चंंद्रा’ या अवकाश दुर्बिणी मार्फत अवकाशाची निरीक्षणे १९९९ पासून सुरु आहेत. पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत ही दुर्बिण भ्रमण करत आहे. भारतीय वंशाचे, नोबेल पुरस्कार सन्मानित, अमेरिकेतील प्रसिद्ध खगोल-भौतिक शास्त्रज्ञ एस सुब्रम्हण्यम यांच्या नावावरुन दुर्बिणीला ‘चंद्रा’ हे नाव नासाने दिलं आहे. अनंत अशा अवकाशातील एक्स रे – क्ष किरण स्त्रोतांचा म्हणजेच न्युट्रॉन तारे आणि कृष्णविवर यांचा अभ्यास या अवकाश दुर्बिणीमार्फत केला जातो.

नुकतंच या दुर्बिणीमार्फत ‘Messier 51’ या दिर्घिकेच्या काही भागाची निरिक्षणे सुरु होती. चंद्राने टिपलेल्या माहितीचे विश्लेषण सुरु असतांना नव्या ग्रहाचे अस्तित्व सापडल्याचा दावा अमेरिकेतील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. याबाबत एक अहवाल ‘नेचर’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. Messier 51 या दिर्घिकेत क्ष किरणे उत्सर्जित करणाऱ्या ‘M-51-ULS-1’ असं नाव असलेल्या एका स्त्रोताचा अभ्यास सुरु होता. M-51-ULS-1 हा न्युट्रॉन तारा आहे की कृष्णविवर याबाबत चंद्रा दुर्बिणीने पाठवलेली निरिक्षणे अभ्यासली जात होती. तेव्हा M-51-ULS-1 या स्त्रोतातून येणारे क्ष किरण हे काही काळ क्षीण झाल्याची नोंद झाल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं. म्हणजेच या स्त्रोताच्या समोरुन एखादी ग्रह सदृश्य गोष्ट गेली असावी असा अंदाज संशोधकांनी लावला. ही निरिक्षणे पुन्हा पुन्हा पडताळून झाल्यावर संशोधकांची खात्री पटली की M-51-ULS-1 या स्त्रोताच्या भोवती शनीच्या आकाराचा एखादा ग्रह असावा. तेव्हा खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आकाशगंगेबाहेर दुसऱ्या एखाद्या दिर्घिकेत ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे.

आत्तापर्यंत विविध अवकाश दुर्बिणीमार्फत अवकाशाचे निरक्षणे सुरु होती आणि आहेत. यापैकी स्पिटझर ( Spitzer ), केप्लर, TESS अशा अवकाश दुर्बिणीमार्फत पृथ्वीसदृश्य ग्रह हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणजेच जसं आपल्या सुर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह फिरत आहेत, तसंच आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांभोवती असेच ग्रह आहेत का याचा शोध सुरु आहे. आत्तापर्यत कित्येक ग्रह हे माहिती झाले असून यापैकी ३००० पेक्षा जास्त हे आपल्या पृथ्वीसारखे – पृथ्वीसदृश्य ग्रह आहेत असा शास्त्रज्ञांचा – संशोधकाचा दावा आहे. हे सर्व ग्रह पृथ्वीपासून काही हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. अशा ग्रहांवर सजीवसृष्टी आहे का याचे अंदाज बाधले जात आहेत.

आत्तापर्यंत आकाशगंगेतच अशा ग्रहांचा शोध लागला होता. मात्र पहिल्यांदाच चंद्रा या अवकाश दुर्बिणीमार्फत आकाशगंगेबाहेर काही लाख प्रकाशवर्षे दूरच्या अंतरावरील एका दिर्घिकेत एका ग्रहाचे अस्तित्व हे माहिती झाले आहे. यानिमित्ताने क्ष किरण स्त्रोताजवळ ग्रहाचे अस्तित्व शोधण्याचा एका नवा मार्ग सापडल्याची भावना खगोल अभ्यासक आणि शास्त्रज्ञ यामध्ये व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chandra space telescope discovered a planet outside the milky way in messier 51 galaxy asj

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या