गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या चांद्रयान ३ या मोहिमेकडे होतं. चांद्रयान २ मोहीम अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान ३ मोहिमेत यश मिळवण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि भारतीयांना तो ऐतिहासिक क्षण पाहता आला. भारताची चांद्रयान ३ ही महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी झाली असून इस्रोने पाठवलेलं यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलं आहे. विक्रम लँडरने संध्याकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी चांद्रयानाचं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं.

इस्रोने गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी हे यान अंतराळात पाठवलं होतं. श्रीहरीकोटा येथून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि ४१ दिवसांचा प्रवास करून यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं.

लँडरने यशस्वी अवतरण केल्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. आजवर कुठलाच देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेला नव्हता. भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला असून इस्रोचं हे खूप मोठं यश मानलं जात आहे. दरम्यान, चांद्रयान ३ ने यशस्वी लँडिंगनंतर इस्रोला एक खास संदेश पाठवला आहे. या संदेशात म्हटलं आहे की “मी माझ्या नियोजित ठिकाणी पोहोचलोय आणि तुम्हीसुद्धा!”

या मेसेजपाठोपाठ विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो पाठवले आहेत. तसेच विक्रम लँडरने चांद्रयान ३ आणि बंगळुरूतल्या इस्रोच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क जोडला आहे. त्यामुळे आता चांद्रयान ३ आणि इस्रोमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय संपर्क होईल. चांद्रयान ३ बरोबर पाठवलेला प्रज्ञान रोव्हर तिथे जी काही माहिती गोळा करेल, विक्रम लँडरद्वारे जे काही फोटो काढले जातील ते सगळे इस्रोला मिळत राहतील.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : मोहिमेवरील खर्च किती? लँडिंगनंतर पुढे काय? जाणून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीपणे उतरला असून आता HAZARD डिटेक्शन कॅमेरे सुरू केले जातील. लँडिंगनंतरचे धोके तपासण्यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे तिथल्या परिस्थितीचं निरिक्षण केलं जाईल आणि ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर चांद्रयान ३ बरोबर पाठवलेला प्रज्ञान रोव्हर बाहेर येईल. हा रोव्हर चंद्रावर फिरेल आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं परिक्षण करेल, माहिती गोळा करेल आणि ती माहिती इस्रोला पाठवेल.