Mukesh Chandrakar Murder Case : छत्तीसगडमधील बस्तरमध्ये शुक्रवारी (३ जानेवारी) सेप्टिक टँकमध्ये तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याचबरोबर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत, ती जमिनदोस्त केली आहे.

या कारवाईला दुजोरा देताना छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या निर्घृण हत्येनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साव यांनी कठोर भूमिका घेत राज्यातील गुन्हेगारांना कडक संदेश दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने बुलडोझरच्या सहाय्याने मुख्य आरोपीचे बेकायदेशीर घर जमिनदोस्त केले आहे.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

पत्रकार चंद्राकर यांच्या हत्येनंतर गृहमंत्री विजय शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत घेतली होती. यामध्ये त्यांनी मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर हा काँग्रेसचा नेता असल्याचा आरोप केला आहे. गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले की, “या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापन करण्यात आली असून, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जणार आहे.”

मुख्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साव यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “विजापूर येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मुकेश यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

कोण होते मुकेश चंद्राकर?

३२ वर्षांच्या मुकेश चंद्राकर यांनी पत्रकार म्हणून विविध वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले होते. तसेच ‘बस्तर जंक्शन’ नावाचे त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनेलही होते. बस्तर सारख्या नक्षलवादी भागात त्यांनी आजवर न घाबरता वार्तांकन केले होते. एप्रिल २०२१ मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. तेव्हा कमांडोला सोडविण्यात मुकेश चंद्राकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुकेश चंद्राकर यांनी नुकतेच छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील एका रस्ते कामात घोटाळा झाल्याचे उघड केले होते. त्यांच्या बातमीमुळे सदर कामाची चौकशी सुरू करण्यात आली होती. यामुळेच मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.