पीटीआय, उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये मंगळवारी झालेल्या ढगफुटीमुळे गंगोत्रीच्या मार्गावरील धराली या उंच भागातील गावामध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ढगफुटीमुळे अचानक पूर येऊन अनेक घरेही वाहून गेल्याचे सांगण्यात आले. खीर गंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ही ढगफुटी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
धराली हा चार धामांपैकी एक असलेल्या गंगोत्रीच्या मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेथे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि घरगुती निवासव्यवस्था आहेत. सुरुवातीला हाती लागलेल्या माहितीनुसार किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती उत्तरकाशीचे जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली. दुसरीकडे, ढिगाऱ्याखाली १० ते १२ व्यक्ती दबल्या गेल्या असाव्यात असा अंदाज राजेश पंवार या स्थानिकाने व्यक्त केला. तसेच २० ते २५ हॉटेल आणि घरगुती निवासव्यवस्था करणाऱ्या इमारती वाहून गेल्या असाव्यात असे ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. आपण राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बोलून माहिती घेतली असल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही धामी यांच्याशी संभाषण केले आणि पीडितांच्या मदतीसाठी सात बचाव पथके पाठवण्याचे आदेश दिले. तर लोकांना वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे काम करत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
मदत व बचावकार्य सुरू
बचावकार्यासाठी हारसिल येथून लष्कर घटनास्थळी पोहोचले आहे. इंडो-तिबेट सीमा पोलिसांचे (आयटीबीपी) पथक धरालीकडे पाठवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांचीही पथके तैनात करण्यात आली आहेत. मदत व बचावकार्यावर आपण लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्री धामी यांनी सांगतिले.
मी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्याशी बोललो आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत व बचाव पथके शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.