देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला असून अनेकांनी त्याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये राजकीय नेत्यांबरोबरच अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अटलजींच्या जाण्याने माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.
माझ्याप्रमाणे अनेकांनी त्यांना आपला आदर्श मानून त्याप्रमाणे काम करण्याची प्रेरणा घेतली असेही मुख्यमंत्री आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले आहेत. लोकशाहीचा शस्त्राप्रमाणे वापर करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा, शिक्षण त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना दिल्याचे त्यांनी नमूद केले. लहानपणापासून ते काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी घेतलेली त्यांची भेट अशा अटलजींबरोबरच्या माझ्या असंख्य आठवणी आहेत असे सांगत फडणवीस यांनी आपला अगदी लहानपणीचा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी माझी अटलजींशी ओळख करुन दिली आणि त्यावेळी माझा त्यांच्याशी पहिल्यांदाच संवाद झाला. त्यानंतर मागील अनेक वर्षांपासून त्यांचे मार्गदर्शन मिळत राहीले.
श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी…
अटल, अढळ, अचल, नित्य… #AtalBehariVajpayee pic.twitter.com/ljoQlyR1Jg— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 16, 2018
अटलजी उत्तम वक्ते होते, सर्वात उत्तम पंतप्रधान होते, ज्ञानाचा महासागर होते याबरोबरच ते एक उत्तम व्यक्ती आणि प्रत्येकासाठी आदर्श होते असेही फडणवीस यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी अर्पण केले होते. आता ते आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. पण त्यांचे विचार, त्यांची शिकवण आणि तत्वे यांच्या माध्यमातून ते आपल्यात कायम राहतील. केवळ आधीच्या पिढ्यांसाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठीही ते आदर्श ठरतील यात शंका नाही. अशा आपल्या भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी अटलजींना एक पत्रही लिहीले आहे.



