भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचं वचन व भ्रष्टाचार निपटून काढण्याचं आश्वासन हे आजवर सत्तेत येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षानं प्रत्येक निवडणुकीत दिलं आहे. पण अद्याप भ्रष्टाचाराच्या समस्येवर तोडगा काढण्यात कोणत्याच राजकीय पक्षाला यश आलेलं नाही. रोज देशभरात ठिकठिकाणी होणारे नवनवीन खुलासे आणि प्रकरणांचा पर्दाफाश याचेच द्योतक आहेत. हल्लीतर लाच देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी पकडले जाऊ नये म्हणून कोडवर्ड अर्थात दुसऱ्या नावांचा उल्लेख केला जातो. मध्य प्रदेशमधील नर्सिंग कॉलेज घोटाळ्यात असेच काही कोडवर्ड सीबीआयनं उघड केले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये सीबीआयनं एकूण १६९ परिचारिका महाविद्यालयांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये क्लीनचिट दिली. पण १८ मे रोजी सीबीआयने २३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यात खुद्द सीबीआयच्याच ४ अधिकाऱ्यांचा समावेश होता! याव्यतिरिक्त आरोपींमध्ये किमान चार जिल्ह्यांमधल्या नर्सिंग कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. मध्य प्रदेशात २०२०-२१ या काळात कोणत्याही परवानही वा किमान पायाभूत सुविधांशिवाय डझनावारी नर्सिंग कॉलेज उघडले गेल्याची तक्रार न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करण्याचं काम सीबीआयकडे सोपवलं होतं.
संबंधित कॉलेजबद्दल सकारात्मक अहवाल सादर करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या नावांनी लाच देण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. महाविद्यालयांना इन्स्पेक्शनची तारीख कळवण्याच्या बदल्यात लाच घेतल्याची बाब समोर आली आहे. अशी तारीख कळल्यानंतर त्याच्या दोन-तीन दिवस आधी तात्पुरती जमवाजमव करून लॅब, साधनसामग्री अशा गोष्टी उभ्या केल्या जात.
CBI निरीक्षकानंच तयार केले कोड!
दरम्यान, सीबीआयनं सादर केलेल्या ताज्या कागदपत्रांमध्ये विभागातीलच एक अधिकारी आरोपी राहुल राज यानंच लाच स्वीकारण्यासाठी कोड तयार केल्याचा उल्लेख आहे. सीबीआयनं यासाठी आरोपींमध्ये झालेल्या फोन संभाषणाच्या तब्बल ६५८ क्लिप तपासल्या असून त्यातून ही माहिती उघड झाली आहे. एक आरोपी लाच म्हणून आणलेल्या रकमेचा उल्लेख ‘अचार’ (लोणचं) असा करत असल्याचं आढळलं. तसेच, ‘गुलकंद आ गया क्या?’ असा प्रश्न करताच लाचेची रक्कम सोपवण्याचाही उल्लेख या संभाषणात आहे.
एका सीबीआय अधिकाऱ्याच्या पत्नीच्या संभाषणात एका कंपनीच्या सीईओला “सर खोदियार माता का प्रसाद मिल गया क्या?” अशी विचारणा होत असल्याचं आढळून आलं आहे. संबंधित सीईओनं लाचेची रक्कम सोन्याच्या बिस्किटांमध्ये दिली, या बिस्किटांचं एकूण वजन १०० ग्रॅम होतं, असंही सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं आहे.
तसेच, काही आरोपी लाचेच्या रकमेचा उल्लेख करताना ‘सामान’, ‘नौ डिब्बे अचार’ अस म्हणत असल्याचंही त्यांच्या फोन संभाषणातून आढळून आलं आहे. या प्रकरणाची सीबीआयकडून सखोल चौकशी केली जात असून विभागातील आणखी काही अधिकारी यात गुंतले आहेत का? याचीही चौकशी केली जात आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालू आहे.