लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसने आठ राज्यांतील ५७ उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारी जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांवरील उमेदवारांचाही समावेश आहे. महाविकास आघाडीमध्ये वा काँग्रेस अंतर्गत वाद नसलेल्या जागांवरील उमेदवारांची नावे काँग्रेसने घोषित केली आहेत.

सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या व विद्यामान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नंदुरबारमध्ये माजी मंत्री व काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवल पाडवी यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले असून भाजपने या मतदारसंघात विद्यामान खासदार हिना गावीत यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिंदे व पाडवी यांच्या घराण्यातील तरुण पिढीला लोकसभेचे तिकीट देऊन काँग्रेसने मतदारसंघातील उमेदवारीचा वारसा कायम ठेवल्याचे मानले जात आहे. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यावर घटक पक्षांची सहमती होती. शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले होते. मात्र शाहू महाराजांसाठी ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला सोडली आहे.

हेही वाचा >>>विकसित भारत संदेश पाठविणे थांबवा! निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश; आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी

पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अधांतरीच!

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील १५ जागांवरील उमेदवारांवर चर्चा झाली होती. त्यापैकी फक्त ७ जागांवर उमेदवार जाहीर झाले असले तरी १९ एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील एकाही उमेदवाराची घोषणा अजूनही झालेली नाही. पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यासंदर्भातील अधिसूचनाही काढण्यात आली आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून २ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

खरगेचे जावई राधाकृष्ण, अंधीर रंजन, राजीव गौडा रिंगणात

महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश (२), गुजरात (११), कर्नाटक (१७), राजस्थान (५), तेलंगणा (५), पश्चिम बंगाल (८) आणि पुडुचेरी या राज्यांतील उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना गुलबर्गामधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे खरगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले. खरगेंनी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याची मागणी काँग्रेसमधून होत होती. मात्र ती खरगेंनी फेटाळली होती. कर्नाटकमधून बेंगळूरु उत्तरमधून काँग्रेसच्या संशोधन विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने बहरामपूरच्या बालेकिल्ल्यातून पुन्हा अधीररंजन चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. येथे तृणमूल काँग्रेसने क्रिकेटपटू युसूफ पठाणला मैदानात उतरवले आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री नबाम तुकी को उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दोन याद्यांतून ८२ उमेदवार जाहीर केले आहेत.

हेही वाचा >>>मोदींकडून काँग्रेसची आर्थिक गळचेपी; प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईबाबत सोनिया गांधी यांचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण प्रचार समितीचे प्रमुख

लोकसभेसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील काँग्रेसच्या कोअर गटातील सदस्य असलेले चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील उमेदवार

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज ●सोलापूर : प्रणिती शिंदे ●नंदुरबार : गोवल पाडवी ●पुणे : रवींद्र धंगेकर ●अमरावती : बळवंत वानखेडे ●नांदेड : वसंतराव चव्हाण ●लातूर : शिवाजीराव काळगे