करोनामुळे देशाची बिघडती परिस्थिती पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. कठीण परिस्थितीत एकमेकांची मदत करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केलं आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी हॅलो डॉक्टर नावाची संकल्पना पुढे आणली आहे. या माध्यमातून रुग्णांना डॉक्टर आणि मनोविकार तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी डॉक्टर आणि तज्ज्ञ मंडळींना या अभियानासोबत जोडण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘भारतातील प्रत्येक नागरिकाला आता एकमेकांसोबत उभं राहण्याची गरज आहे. वैद्यकीय सल्ल्यासाठी आम्ही हेलो डॉक्टर हे अभियान राबवत आहोत. सल्ल्यासाठी +९१९९८३८३६८३८ या क्रमांकावर फोन करा. तसेच डॉक्टर आणि मानोसोपचार तज्ज्ञांनी या अभियानात सहभागी व्हावं’, असं आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. राहुल गांधी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. सौम्य लक्षणं आढळल्यानंतर चाचणी केली असता करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं होतं.

असंवेदनशील! करोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू; मृतदेह तीन तास गाडीतच होता पडून

गेल्या २४ तासांत तर भारतात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. २४ तासांत ४ लाखांहून जास्त करोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे. त्यामुळे देशातल्या करोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे.