देशात एकूण सात टप्प्यांत निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २० मे) मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराने जोर धरलेला आहे. आज इंडिया आघाडीची प्रयागराजमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव संबोधित करणार होते. मात्र, राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे व्यासपीठावर पोहोचताच समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेतल्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.

अखिलेश यादव यांनी समर्थकांचा गोंधळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, तरीही १५ ते २० मिनिटे गोंधळ सुरू राहिला. त्यामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना सभेला संबोधित करता आलं नाही. यानंतर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना भाषण न करताच निघून जावं लागलं. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी लाठीचार्च केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. या सभेला लोकांनी केलेल्या गर्दीची मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : “पक्ष फुटला नसता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो”, शरद पवारांच्या ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारासाठी अखिलेश यादव आणि राहुल गांधी आले होते. मात्र, समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेत केलेल्या गोंधळानंतर अखिलेश यादव हे संतापून निघून गेले. त्यानंतर राहुल गांधीही निघून गेले. त्यामुळे सभा ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना भाषण न ऐकताच पुन्हा परत परतावं लागलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅरिकेड्स तोडून लोक व्यासपीठावर पोहोचली

इंडिया आघाडीची उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये फुलपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा हातात घेऊन दिसत आहेत. मात्र, या सभेसाठी एवढी मोठी गर्दी झाली होती की लोक थेट बॅरिकेड्स तोडून व्यासपीठावर पोहोचले होते. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे गोंधळ झाला. त्यामुळे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना सभेला संबोधित करता आलं नाही. लोकांनी राहुल गांधी यांच्या या सभेला केलेल्या अभूतपूर्व गर्दीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच पोलिसांनाही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.