करोना विषाणूच्या फैलाव रोखण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारांकडून अनेक पावलं उचलली जात असताना सुप्रीम कोर्टानेही याबाबत एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. सोमवारपासून (१६ मार्च) हा आदेश लागू होणार आहे.

त्याचबरोबर, कोर्टाचा परिसर आणि कोर्ट रुममध्ये वकिलांशिवाय इतर कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या परिसरात कायम वकिलांची आणि लोकांची गर्दी असते. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दीच्या जाण्याचं टाळावं अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. त्या सूचना कोर्टासाठी देखील लागू होतात. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी गुरुवारी मोठा निर्णय घेतला. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहं तसेच शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीत आजवर पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.