भारतात निम्नपोषित लोकांच्या संख्येत घट, प्रौढांतील लठ्ठपणात वाढ

संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संग्रहित छायाचित्र
 

भारतात भुकेल्या म्हणजे निम्नपोषित व्यक्तींच्या संख्येत दशकभरात सहा कोटींनी घट झाली असल्याचे संयुक्तराष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या कमी असून देशात लठ्ठ प्रौढांची (१८ वर्षे व त्यापुढील वयाचे लोक)  संख्या जास्त आहे, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे

अन्न सुरक्षा व पोषण या विषयावरील जागतिक अहवालात म्हटले आहे, की जगात  २०१९ मध्ये ६९ कोटी लोक  निम्नपोषित आहेत. २०१८ मधील संख्येपेक्षा ही संख्या १ कोटींनी वाढली आहे.

या अहवालात जगातील प्रमाणित अभ्यासांचा आधार घेण्यात आला असून भारतातील कमी पोषित म्हणजे भुकेल्या व्यक्तींची संख्या २००४-०६ मध्ये २४९.४ दशलक्ष होती, ती २०१७-१९ मध्ये १८९.२ दशलक्षपर्यंत खाली आली आहे. टक्केवारीत सांगायचे भारताच्या एकूण लोकसंख्येत निम्नपोषित लोकांचे प्रमाण २१.७ टक्क्य़ांवरून (२००४-०६) १४ टक्के  (२०१७-१९)इतके खाली आले आहे. पूर्व व आग्नेय आशियात निम्नपोषितांची संख्या कमी झाली आहे. त्यात चीन व भारत या देशांचा  समावेश आहे. भारतात पाच वर्षांखालील मुलांची वाढ खुंटण्याचे प्रमाण २०१२ मध्ये ४७.८ टक्के होते ते २०१९ मध्ये ३४.७  टक्के झाले. ते प्रमाण २०१२ मध्ये ६.२० कोटी होते, ते २०१९ मध्ये ४.०३ कोटी झाले.  भारतात प्रौढांमध्ये लठ्ठपणा वाढल्याचे दिसून आले आहे. १८ वर्षे व त्यावरील वयाच्या प्रौढात हे लठ्ठपणा जास्त असलेल्यांचे प्रमाण २०१२ मध्ये २५.२ दशलक्ष होते, ते २०१६ मध्ये ३४.३ दशलक्ष झाले. याचाच अर्थ ते ३.१ टक्क्य़ांवरून ३.९ टक्क्य़ांपर्यंत गेले. १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढले. २०१२ मध्ये १६५.६ दशलक्ष महिलात रक्तक्षय म्हणजे अ‍ॅनिमिया होता, ते प्रमाण २०१६ मध्ये १७५.६ दशलक्ष झाले. ०-५ महिन्यांत स्तनपान मिळणाऱ्या मुलांचे प्रमाण २०१२ मध्ये ११.२ दशलक्ष होते ते २०१९ मध्ये १३.९ दशलक्ष झाले. निम्नपोषित लोकांचे प्रमाण आशियात कमी असले, तरी आफ्रिकेत ते वेगाने वाढत आहे. कोविड १९ मुळे २०२० अखेरीस आणखी १३ कोटी लोक गंभीर उपासमारीच्या संकटात लोटले जाणार आहेत. आफ्रिकेत निम्नपोषितांचे प्रमाण १९.१ टक्के आहे. २०३० मध्ये जगातील निम्मे भुकेले लोक आफ्रिकेत असतील. आर्थिक मंदीमुळे जगात २०२० अखेरीस ८३ दशलक्ष ते १३२ दशलक्ष लोक भुकेलेल्यांच्या गटात असतील. जगातील तीन अब्ज लोकोंना यापुढील काळात चौरस आहार मिळणार नाही, अशी शक्यता आहे. २०१९ मध्ये पाच वर्षांखालील १९१ दशलक्ष मुलांची वाढ खुंटलेली होती, त्याचबरोबर ३८ दशलक्ष मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Decline in the number of undernourished people in india increase in obesity in adults abn