Deportation Of US Criminals: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्मलेल्या आणि गुन्हे करणाऱ्या नागरिकांना देशाबाहेर काढण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, हे त्यांच्या प्रशासनाचे “पुढील काम” असेल. नुकतेच फ्लोरिडा येथील एव्हरग्लेड्समधील स्थलांतरितांच्या बंदी केंद्राच्या दौऱ्यादरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले, “त्यापैकी बरेच जण आपल्या देशात जन्मले आहेत. मला वाटते की आपण त्यांनाही येथून बाहेर काढले पाहिजे.”

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले, “जे लोक इतरांवर बेसबॉल बॅटने डोक्यात वार करतात किंवा चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करतात, त्यांना अमेरिकेतून हाकलून लावले पाहिजे, जरी ते अमेरिकन नागरिक असले तरीही. आणि हेच आमच्या प्रशासनाचे पुढील काम आहे.”

अमेरिकेच्या न्याय विभागाने गेल्या महिन्यात एक मेमो जारी केला होता, ज्यामध्ये काही लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. या लोकांमध्ये गुन्हेगार, हेरगिरी करणारे आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेमोमध्ये म्हटले आहे, “जर एखाद्या व्यक्तीने युद्ध गुन्हे, हत्या किंवा इतर गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे आढळले, तर त्याचे नागरिकत्व रद्द केले जाईल. गुन्हेगार, टोळी सदस्य किंवा अमेरिकेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्यांना नागरिकत्व नाकारण्यात येईल. तसेच, दोषी दहशतवाद्यांना अमेरिकेच्या भूमीवर परत येण्यापासून किंवा अमेरिकन पासपोर्टवर आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यापासून रोखण्यात येईल.”

अ‍ॅक्सिओसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, १९९० ते २०१७ दरम्यान, अमेरिकी न्याय विभागाने सुमारे ३०५ लोकांचे नागरिकत्व रद्द केले आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, जर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली, तर त्याचा परिणाम सुमारे २.५ कोटी अमेरिकन नागरिकांवर होऊ शकतो.