Donald Trump On Israel Iran War Tension : इस्रायलने शुक्रवारी इराणवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यामुळे दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या अनेक लष्करी तळांना व इराणमधील आण्विक तळांना लक्ष्य केल्याचं सांगितलं जातं. पाठोपाठ इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यात इराणमध्ये झालेल्या नुकसानाची माहिती समोर आली आहे.
यामध्ये इराणच्या लष्करातील अनेक मोठे अधिकारी व अणूशास्त्रज्ञ ठार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, आता इराण देखील प्रत्युत्तर देण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे इस्रायलने आणीबाणी जाहीर करत लष्करी दलांना अलर्ट केलं आहे. या सर्व घडामोडी पाहता इराण आणि इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला अमेरिकेबरोबर अणु करार करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच असा इशाराही दिला आहे की इराणवरील पुढील नियोजित हल्ले आणखी क्रूर असतील अशा आशयाची डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट ट्रुथ या सोशलवर माध्यमावर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणला सूचक इशारा दिला आहे. आधीच मोठ्या प्रणाणात विनाश झाला आहे. मात्र, पुढील नियोजित हल्ला आणि हा विनाश टाळण्यासाठी अजूनही वेळ आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
“मी इराणला करार करण्यासाठी अनेकवेळा संधी दिली. मी त्यांना कडक शब्दांत देखील सांगितलं होतं की बस करार करा. त्यांनी कितीही प्रयत्न केले, ते कितीही जवळ आले तरी ते पूर्ण करू शकले नाहीत. मी त्यांना सांगितलं होतं की त्यांना माहित असलेल्या किंवा अपेक्षित असलेल्या तथा सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप जास्त वाईट असेल. अमेरिका जगात कुठेही सर्वात चांगलं आणि सर्वात घातक लष्करी उपकरणे बनवतं. इस्रायलकडे याचा भरपूर मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे. तसेच येणार्या काळात अजून बरंच काही होईल. तसेच त्यांना ते कसं वापरायचं हे देखील माहिती आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.