ई-सिगारेट आणि व्हॅप्स यांसारख्या निकोटिनयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल संघटनेने (सीडीएससीओ) मंगळवारी ई-सिगारेटला ड्रग्ज म्हणून प्रतिबंधित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

या प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीडीएससीओला उत्पादन, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालता येणे शक्य होणार आहे. मात्र याचा व्हेपर उत्पादने बाजारपेठेला फटका बसणार आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालय आणि सीडीएससीओने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.

कर्नाटक, केरळ, मिझोराम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश अलीकडेच जारी केले आहेत.