National Herald case Rahul Gandhi And Sonia Gandhi: अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी दिल्लीतील एका न्यायालयात सांगितले की, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या २ हजार कोटींच्या मालमत्तेची मालकी केवळ ५० लाख रुपये देऊन मिळवली आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, “असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडे दिल्ली, लखनऊ, भोपाळ, इंदूर, पंचकुला, पाटणा आणि इतर ठिकाणी मालमत्ता आहेत आणि या सर्व मालमत्ता केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी १९४७ नंतर वृत्तपत्र छपाई आणि प्रकाशनासाठी दिल्या आहेत. पण, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ताब्यात घेतल्यानंतर लगेचच यंग इंडियन (गांधींच्या नियंत्रणाखालील संस्था) ने घोषित केले की, ते नॅशनल हेराल्डसह कोणत्याही वृत्तपत्र प्रकाशनात सहभागी होणार नाहीत. २००० कोटी रुपयांची संपूर्ण कंपनी ताब्यात घेण्यासाठी त्यांनी फक्त ५० लाख रुपये दिले.”
दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्यासमोर हे निवेदन सादर करण्यात आले आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या फिर्यादी तक्रारीची दखल घ्यावी की नाही, याबाबत न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे.
सुनावणीदरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी असेही म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि पैसे वळवण्यासाठी फसवे व्यवहार केले गेले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला दिलेले ९० कोटींचे कर्ज फक्त ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात यंग इंडियनला हस्तांतरित केल्याचा गंभीर आरोप आहे. या इक्विटी व्यवहारामुळे २००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा गैरवापर झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या खाजगी तक्रारीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि गांधी कुटुंबाच्या नियंत्रणाखालील यंग इंडियनवर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, गुन्हेगारी विश्वासघात आणि मालमत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.
ईडीने या वर्षी १५ एप्रिल रोजी गांधी कुटुंबासह पित्रोदा आणि इतरांविरुद्ध खटला दाखल केला आहे.